नळवणे गडावर श्री कुलस्वामी खंडेराय चंपाषष्ठी महोत्सव साजरा
1 min read
आणे दि.८:- महाराष्ट्राचे कुलदैवत समजल्या जाणाऱ्या श्री कुलस्वामी खंडेरायाच्या श्री क्षेत्र नळवणे (ता.जुन्नर) गडावर शनिवार (दि.७) रोजी चंपाषष्ठी महोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा झाला. निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच श्री कुलस्वामी खंडोबा मंदिर जीर्णोद्धार व सुवर्ण कलशारोहन १८ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला.या बाबत सविस्तर माहिती अशी की, सदानंदाचा येळकोट , ‘येळकोट येळकोट जयमल्हार’ च्या जयघोषात नळवणे श्री कुलस्वामी खंडेराय मंदिरात चंपाषष्ठी साजरी करण्यात आली. खंडोबा मंदिरात आयोजित विविध कार्यक्रमांमुळे कुलस्वामी गड भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता.
चंपाषष्ठी उत्सवाची परंपरा पेशवेकालीन असून, हा उत्सव सहा दिवस चालतो. सकाळी खंडोबाला अभिषेक, त्यानंतर महापूजा व नंतर दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नळावणे येथे चंपाषष्ठी यात्रेनिमित्त कुलस्वामी खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातल्या भाविकांचा ओघ सुरू होता.
तळी भंडार तसेच परिसरामध्ये भंडाऱ्याची उधळून करण्यात आली. पहाटे पाच वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या, असे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी सांगितले. कुलस्वामी गडावर खंडोबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात हार, फुले, नारळ, खाऊची दुकाने लागत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
या यात्रेनिमित्त रेवड्या, गोडी शेव, तसेच मातीच्या खेळणीला मागणी होती, असे बाबाजी शिंदे, प्रल्हाद देशमुख, भानुदास हाडवळे यांनी सांगितले. नळवणेच्या खंडोबा मंदिरात सकाळी मानाच्या अश्वाला विधीवत अंघोळ घालून मंदिरात आणल्यानंतर देवदर्शन घडवण्यात आले. त्यानंतर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
दुपारी भाविकांच्या करमणुकीसाठी वाघ्या मुरळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी ४ ते ६ हभप यशवंत महाराज थोरात यांचे हरिकीर्तन संपन्न झाले. तसेच चंपाषष्ठीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून देवस्थानने गडावर भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
तसेच भाविकांसाठी शुद्ध पिण्याची पाण्याची व्यवस्था तसेच पार्किंग व्यवस्था व भाविकांना श्री चे दर्शन सुलभ व्हावे यासाठी खाजगी सुरक्षा व्यवस्था केली होती. आळेफाटा पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अशी माहिती श्री कुलस्वामी खंडेराया देवस्थान चे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिली.