शिरूरमध्ये महसूल सहायक पाच हजार रुपयांची लाच घेताना जाळ्यात
1 min read
शिरूर दि.७:-शिरूर येथील तहसीलदार कार्यालयातील एक महसूल सहायक पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. सदर महसूल सहायकावर अटकेची कारवाई करण्यात आली.शिरूर तहसीलदार कार्यालयातील महसूल सहायक नितेशकुमार धोंडीबाराव धर्मापुरीकर याला पाच हजार रुपयांची तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिली आहे.
२८ वर्षे पुरुष तक्रारदार यांचे गट नंबर १९ च्या सात-बारा उताऱ्यावर असलेले इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी तक्रारदार यांनी तहसिलदार कार्यालयास अर्ज केला होता. सदरचा अर्ज लोकसेवक नितेशकुमार धर्मापुरीकर यांचेकडे प्रलंबित असून.
या सात-बारा उताऱ्यावरील इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी लोकसेवक नितेश धर्मापुरीकर यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली होती.
सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक नितेशकुमार धर्मापुरीकर यांनी तक्रारदार यांचेकडे वरील कामासाठी पाच हजार रुपयाची लाचेची मागणी करुन, पाच हजार रुपये तक्रारदाराकडून पंचासमक्ष स्वीकारले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले.
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे करीत आहेत.