मतदान यंत्र पडताळणीसाठी सहा उमेदवारांनी भरली तब्बल ‘एवढी’ रक्कम
1 min read
अहिल्यानगर दि.२९:- विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीने मतदान यंत्र सदोष असल्याचा आरोप केला असून आता या मतदान यंत्र पडताळणी करण्याचा आग्रह त्यांनी निवडणूक आयोगाकडे केला आहे. जिल्ह्यात सहा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. उद्या शुक्रवार अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने उद्या कोण कोण अर्ज दाखल करणार याची प्रतीक्षा आहे. सध्या तरी महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे यांच्या पाठोपाठ बाळासाहेब थोरात, राणी लंके, अभिषेक कळमकर, संदीप वर्षे यांच्यासह भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे.
संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात(काँग्रेस) यांनी संगमनेरमधील १४ केंद्रातील मतदान यंत्राच्या जोड्या (सीयु, बीयु व व्हीव्हीपॅट) तपासणीसाठी ६ लाख ६० हजार ८०० रुपये बँकेत जमा केले आहे. पारनेरमधून खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट)
यांनी पारनेरमधील १८ मतदान केंद्रातील यंत्रे ८ लाख ४९ हजार ६०० रुपये जमा, कर्जत जामखेडमधून प्रा. राम शिंदे (भाजप) यांनी मतदारसंघातील १७ मतदान यंत्रे ८ लाख २ हजार ४०० रुपये जमा, अहमदनगरमधून अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी शरद पवार गट)
यांनी शहर मतदारसंघातील ३ यंत्रे १ लाख ४१ हजार ६०० रुपये जमा, राहुरीतून प्राजक्त तनपुरे(राष्ट्रवादी शरद पवार गट) यांनी मतदारसंघातील ५ यंत्रे २ लाख ३६ हजार रुपये जमा तर कोपरगावमध्ये संदीप वर्षे (राष्ट्रवादी-शरद पवार गट)
यांनी मतदारसंघातील पोहेगाव या एका केंद्रातील यंत्र पडताळणीसाठी ४७ हजार २०० रुपये शुल्क जमा करून अर्ज केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या लोकसभा निवडणुकीपासून पराभूत उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मतदारसंघातील एकूण मतदान यंत्रांच्या ५ टक्क्यांपर्यंत
यंत्रांची पडताळणी करण्याची सवलत देऊ केली आहे. मात्र, ही त्यासाठी प्रत्येक यंत्राच्या पडताळणीसाठी ४० हजार रुपये अधिक १८ टक्के जीएसटी असे शुल्क लागू केले. ही रक्कम काही लाखांच्या घरात जाते. यासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल दि. २३ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला. पडताळणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत उद्यापर्यंत आहे. मात्र या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाने विशिष्ट कार्यपद्धत ठरवली आहे. जर मतदारसंघातील निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले.
असेल तर न्यायालयाच्या परवानगीनंतर पडताळणी केली जाईल. न्यायालयात आव्हान दिले गेले नसेल तर ४५ दिवसानंतर पडताळणी होईल. त्यास उमेदवार व त्याच्या प्रतिनिधीला उपस्थित राहता येईल.
मात्र निकालाला न्यायालयात आव्हान देण्याची मुदतच ४५ दिवसांची आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार डॉ सुजय विखे यांनी ४० मतदान यंत्र पडताळणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे शुल्क भरून अर्ज केलेला आहे.