स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) २०२४ मध्ये जयहिंद अभियांत्रिकी महाविदयालय अंतिम फेरीत

1 min read

नारायणगांव दि.२६:- स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) २०२४ मध्ये जयहिंद अभियांत्रिकी महाविदयालय अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे. देशव्यापी उपक्रमाची अंतिम फेरी ही १२ व १३ डिसेंबर २०२४ रोजी चेन्नई या ठिकाणी होणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकळ यांनी दिली.

या उपक्रमामध्ये महाविद्यालय स्तरावर पहिली स्पर्धा पार पडली यामधुन निवड झालेल्या संघाची माहिती स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) च्या संकेतस्थळावर भरण्यात आली. या संपुर्ण देशभरातून आलेल्या संघ व त्यांच्या प्रयोगाची निवड ऑनलाईन पध्दतीने करण्यात येऊन जयहिंद महाविद्यालयाला अंतिम फेरीत स्थान मिळाले.

शेख हुसेन, मंजुषा कुटे, आशिष नलावडे, सानिका शेळके, साहिल मुंढे, शिवानी बोऱ्हाडे अशी या अंतिम फेरीत निवड विद्यार्थ्यांची नावे असून प्रा. अभिषेक बांगर व प्रा. सचिन भोसले यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

स्मार्ट इंडिया हॅकाथॉन हा केंद्र शासनाचा देशव्यापी उपक्रम आहे. या उपक्रमामधून तरूणांना मर्यादेपलिकडे विचार करून त्यांच्या कल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. या उपक्रमामधून तरूणांनी नाविण्यपुर्ण व समालोचनात्मक विचार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

सध्याच्या युगातील विविध सामाजिक व व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी तसेच संस्कृतीची जपणूक करण्यासाठी नवीन कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. शैक्षणिक ज्ञान व व्यावहारिक प्रात्यक्षिक अनुप्रयोग यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.

SIH ने तरुण मनांमध्ये, विशेषत: संपूर्ण भारतातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये नाविण्यपुर्ण विचारसरणीला प्रोत्साहन देऊन महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.

हॅकाथॉन विद्यार्थ्यांना केवळ त्यांची कौशल्ये दाखवण्याची संधी देत नाही तर उद्योगातील तज्ञ, सरकारी संस्था आणि इतर भागधारक यांच्या सहकार्याला प्रोत्साहन दिले जाते.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी.एस.गल्हे, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल, सर्व विभागप्रमुख व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे