राम गावडे यांचा शिवसेनेला राम-राम, बुधवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करणार भाजपात प्रवेश

1 min read

पुणे दि.३:- पुणे जिल्ह्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या ५ एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्रवेश करताना ते काही समर्थक देखील आपल्यासोबत घेऊन जाणार आहेत. या प्रवेशाने ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पडणार आहे.

पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी राम गावडे यांनी मोठे काम केले असून त्यांना शिवसेनेकडून जिल्ह्याचे प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांना विकासासाठी काही दिले नाही. सतत अवमानाची वागणूक तसेच वारंवार बैठका घेऊनही त्यावर काहीच अंमलाबजावणी झाली नाही. त्यामुळे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ आणि शिरूर लोकसभा मतदार संघ या दोन्ही मतदार संघातील कार्यकर्त्यांना घेऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राम गावडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

“शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी आमदार सुरेश गोरे यांचे कुटुंब शिवसेनेत (शिंदे गट) दाखल झाले तरी देखील उद्धव ठाकरे यांनी आपली दखल घेतली नाही, त्यामुळे ठाकरे गटातील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत असल्याचे पत्र उद्धव ठाकरे यांना ३१ मार्च रोजी पाठविले आहे.”

– राम गावडे, माजी जिल्हा प्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे