महाविकास आघाडीचा दारुण पराभव का झाला? महाविकास आघाडीवर आत्मचिंतनाची वेळ? ही पाच कारणे!
1 min read
मुंबई दि.२४:- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीने अभूतपुर्व असा विजय संपादन केला आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी महायुतीने तब्बल २३५ जागा मिळवल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीचा मात्र दारुण पराभव झाला असून तिन्ही पक्षांना मिळून फक्त 50 जागा मिळाल्यात. धक्कादायक म्हणजे काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या दिग्गजांनाही पराभव स्विकारावा लागला आहे.
काही महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश पाहता मविआ विधानसभेला करिश्मा दाखवतील, असे चित्र होते. तसेच शेतकरी प्रश्न, महिला अत्याचाराची वाढती.
प्रकरणे, मराठा-ओबीसी वाद, मनोज जरांगेंचे आंदोलन अशा अनेक कारणांमुळे सत्ताधारी महायुतीविरोधात असंतोष होता. तरीही महाविकास आघाडीचा इतका दारुण पराभव का झाला? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महाविकास आघाडीच्या पराभवाची संभाव्य पाच कारणे?
1 जागा वाटपाचा वाद
महाविकास आघाडीमध्ये जागा- वाटपावरुन मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले, जो अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरु होता. लोकसभेला ज्याप्रमाणे सांगली पॅटर्न राबवला गेला त्याचप्रमाणे मविआमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी अन् कुरघोडी पाहायला मिळाली. याचाच फटका त्यांना निकालामध्ये बसल्याचे दिसत आहे.
2 मुख्यमंत्रीपदावरुन घमासान
महाविकास आघाडीच्या पराभवाचे आणखी एक कारण म्हणजे मुख्यमंत्रीपदावरुन सुरु झालेले दावे, प्रतिदावे.महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट असे सर्वच पक्ष मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकत होते. संजय राऊत यांच्याकडून वारंवार उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील अशी विधाने केली जात होती तर दुसरीकडे काँग्रेसमध्येही मुख्यमंत्रीपदावरुन कुरघोडी सुरु होती. एकीकडे नाना पटोले तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार
आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरु असल्याची चर्चा होती. महायुतीच्या नेत्यांनीही त्याविरोधात प्रचार केला. ज्याचा फटकाही महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर बसला.
3 काँग्रेस आणि ठाकरे गटामधील मतभेद
लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद पाहायला मिळाला. विदर्भातील अनेक जागांवरुन काँग्रेस-ठाकरे गटात संघर्ष सुरु होता. हा वाद इतका होता की थेट दिल्ली हायकमांडला याची दखल घ्यावी लागली. त्यानंतरही अनेक मतदार संघांमध्ये काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट असाच अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला. या अंतर्गत राजकारणाचाही मोठा फटका महाविकास आघाडीला बसला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीकडे महायुतीला घेरण्यासाठी अनेक मुद्दे होते. शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, मालवणमधील पुतळा दुर्घटना, पोर्शे अपघात, बदलापुर अत्याचार प्रकरण असे अनेक विषय होते.
मात्र विरोधकांना या मुद्यावरुन प्रचार करता आला नाही. तसेच सत्ताधाऱ्यांना सवालही करता आले नाहीत. याचाही मविआला फटका बसला.
5 लाडकी बहीणचा फटका
महाविकास आघाडीने महायुतीच्या लाडकी बहीण योजनेविरोधात जोरदार प्रचार केला, या योजनेवर टीकाही केली. दुसरीकडे आपल्या जाहीरनाम्यात त्याच्यात सुधारणा करण्याची घोषणा केली. महाविकास आघाडीकडे महायुतीला तोड देईल असा जाहीरनामाही तयार करता आला नाही. याऊलट महायुतीने लाडकी बहीणचा जोरदार प्रचार केला ज्याचा त्यांना चांगला फायदा झाला.