शिर्डीत यात्रेत फिरता पाळणा अचानक कोसळला; चौघे जखमी तर एकाची प्रकृती गंभीर
1 min readशिर्डी दि.२:- शिर्डीच्या रामनवमी उत्सवात धक्कादायक घटना घडली असून यात्रेत असलेला पाळणा अचानक तुटल्याची घटना घडली. या घटनेत पाळण्यात बसलेले चौघे भाविक जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. काल सायंकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सध्या शिर्डीत रामनवमीचा उत्साह सुरु असल्याने भाविकांची गर्दी आहे.
या घटनेत ज्योती किशोर साळवे, किशोर पोपट साळवे यांना अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते. तर भूमिका साबळे ही किरकोळ जखमी असून प्राथमिक उपचारानंतर तिला घरी पाठविण्यात आले आहे. प्रविण आल्हाट हे सुद्धा या घटनेत जखमी झाले आहेत. जखमींना आर्थिक मदतीची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
दरम्यान, शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात रामनवमीचा उत्साह आहे. राज्यभरातून भाविक शिर्डीत दाखल झाले असल्याने जत्रेचे स्वरूप आले आहे. अशातच परिसरात पाळणे, खेळण्यांची दुकाने यासह विविध दुकानांची रेलचेल पाहायला मिळत आहे. अशातच काल रात्री पाळणा निखळल्याची घटना घडली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दूरध्वनीवरून जखमींची विचारपूस केली आहे. साईबाबा रूग्णालयात उपचारासाठी दाखल जखमी रूग्णांवर तात्काळ उपचार करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत.
त्यापैकी दोघांना नाशिकला हलविण्यात आले असून इतर जखमींवर साईबाबा रूग्णालयातील वैद्यकीय उपसंचालक डॉ. प्रितम वडगावे यांच्या देखरेखीखाली जखमींवर उपचार सुरू आहेत. पाळणा निखळून पडण्याच्या घटनेनंतर सर्व पाळणे बंद करण्यात आले होते.