परळीत मोठा राडा; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्र फोडलं, ईव्हीएम मशिनही तोडले, मतदान ठप्प

1 min read

बीड दि.२०:- राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मतदानाच्या रणधुमाळीत अनेक ठिकाणी मारहाण आणि वादावादीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, परळी येथील घाट नांदूरगावात मतदान केंद्रात तोडफोडीची घटना घडली आहे. या ठिकाणी काही जणांनी मतदान केंद्र फोडले असून ईव्हीएम मशीन देखील तोडले आहे. यामुळे येथील मतदान ठप्प झाले आहे.राज्यात सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. मात्र, परळी मतदारसंघात मतदान प्रक्रियेला गालबोट लागले आहे. राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घाट नांदूरगावात मतदान केंद्रात तोडफोड केली. या केंद्रातील ईव्हीएम मशीन देखील फोडण्यात आले आहे. तसेच येथील मतदान बंद करण्यात आले आहे. बूथक्रमांक ३ वर ही तोडफोड करण्यात आली आहे. बन्सी शिरसाट या कार्यकर्त्याची गाडी सुद्धा काही जणांनी फोडली आहे. या घटनेमुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या ठिकाणी सध्या तणावपूर्ण शांतात आहे. माधव जाधव यांना मारहाण करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाईची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.परळीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे मैदानात आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेसाहेब देशमुख हे निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्या कार्यकर्ते माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी माधव जाधव यांना मारहाण केलीय. माधव जाधव हे परळी शहरातील मतदान केंद्रास भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. याचे पडसाद उमटले असून घाट नांदुरगावात तोडफोड करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे