जे सत्य आहे, ते समोर आहे; पैसे वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडे स्पष्टच बोलले

1 min read

वसई दि.१९:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात उद्या मतदान होणार आहे. याआधी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी नालासोपाऱ्यात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला.

यावरून राज्यातील राजकारणात ठिणगी पडली असून विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. मात्र, विनोद तावडे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

विनोद तावडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. मी निवडणुकी संदर्भातील काही गोष्टी सांगण्यासाठी तिथे पोहोचलो होतो. त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले. त्यांचा असा गैरसमज झाला की, मी तिथे पैसे वाटतो आहे.

पण याप्रकरणी आता निवडणूक आयोग आणि पोलीस तपास करीत आहेत. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेजही आहे. मी गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे. जे सत्य आहे, ते समोर आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी माझी मागणी आहे, असे विनोद तावडे म्हणाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद तावडे हे आज सकाळी विरार पूर्वच्या मनोरीपाडा परिसरातील एका हॉटेलमध्ये आले. या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी भेट घेण्यासाठी ते या हॉटेलमध्ये आल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचवेळी क्षितिज ठाकूर हे बहुजन विकास आघाडीच्या इतर कार्यकर्त्यांसह विवांता हॉटेलमध्ये आले.

दरम्यान, विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याचा त्यांनी आरोप केला. त्या ठिकाणी अनेक डायऱ्या सापडल्या, ज्यात १५ कोटी रुपयांची नोंद असल्याचा खळबळजनक आरोप ठाकूर यांनी केला आहे. विनोद तावडेंकडे सापडलेल्या डायऱ्या ठाकूर यांनी माध्यमांना दाखवल्या.

बीव्हीएचे ठाकूर यांनी तावडे यांच्यावर केलेल्या आरोपांच्या आधारे पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत. पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी तावडे हे मतदार नसल्याने निवडणुकीच्या ४८ तास आधी विरारमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल, असे सांगितले.

भाजप नेत्याला वसई विरार सोडण्यास सांगण्यात आले. तावडे यांच्या कार, हॉटेल आणि बॅग्जची तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये मतदारांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद आहे.

वसई-विरारमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याची तक्रार आमच्याकडे आली. वसई विरारचे जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त आवश्यक ती कारवाई करत आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे