बोरी बुद्रुक ते आळे रस्त्याची दुरावस्था ; शाळकरी विद्यार्थी, प्रवाशांचे हाल

1 min read

आळे दि.२:- बोरी बुद्रुक ते आळेगाव हा पाच किलोमीटर लांबीचा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. जानेवारी महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरले गेले होते, परंतु हे काम इतके निकृष्ट दर्जाचे होते की दोन महिन्याच्या आत रस्त्यावरील खडी निघून बाहेर आली आहे व खड्डे पडले आहे. आळेफाट्याकडे जाण्यासाठी मुख्य मार्ग म्हणून ह्या मार्गाचा वापर करीत असताना शालेय विद्यार्थी, नागरिक, ऊस वाहतूक या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ते जा-ये करत असतात. परंतु या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे दुचाकी व मोठ्या गाड्या चालवणे म्हणजे तारेवरची कसरत होऊन बसली आहे. रस्त्यालगची खचलेली साईट पट्ट्या यामुळे वारंवार अपघाताची मालिका सुरू आहे.

या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मागील सरकारच्या काळात आळे ते बोरी बुद्रुक या रस्त्याला मंजुरी मिळवून 3 कोटी २५ लक्ष निधी 4 कि.मी साठी तरतुद करण्यात आला असून हा रस्ता 5.5 मीटर रुंदीकरणासह दुरुस्त होणे अपेक्षित होते. सरकार पडले आणि पुढील सर्व कार्यवाही थांबली गेली. अधिकारी वर्गाकडून माहिती घेतली असता टेंडर होऊन पुढील दोन महिन्यात रस्त्याचे काम सुरू होईल असे सांगितले जात जरी असले तरी या अगोदर रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे भरले जावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे