देवेंद्र फडणवीस – अजित पवार आमने सामने! ‘बटेंगे तो कटेंगे’ वरून महायुतीत जुंपली? म्हणाले, “राष्ट्रवादी मिजास…”
1 min read
मुंबई दि.१६:- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा राजकीय वादंग उठला आहे. त्यांच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देत जनतेला सावधानतेचा इशारा दिला होता. त्यानंतर आदित्यनाथ यांच्यावर टीका सुरू झाली. मात्र भाजपा नेत्यांनी व शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांनी देखील योगींचा हा नारा उचलून धरला आहे.
तर, महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) या घोषणेपासून आंतर राखलं आहे. या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी ते व त्यांचा पक्ष या घोषणेशी सहमत नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यापाठोपाठ भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील अशा घोषणेची आवश्यकता नसल्याचं नमूद केलं.
दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’असा नारा दिला. मात्र, या दोन घोषणांमुळे महायुतीत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.देवेंद्र फडणवीसांनी योगी आदित्यनाथ यांची घोषणा उचलून धरली आहे, तर मोदींच्या घोषणेला महामंत्र म्हटलं आहे. तर, त्यांचे सहकारी अजित पवार मात्र याविरोधात आहेत.
यावर आता फडणवीसांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “या लोकांना (अजित पवार व पंकजा मुंडे) जनतेच्या भावना समजल्या नसतील. त्यांना काहीतरी वेगळं बोलायचं असेल आणि तुम्ही प्रसारमाध्यमांनी काहीतरी वेगळं अर्थ घेतला असेल.
किंवा त्यांना योगींच्या वक्तव्याचा अर्थ समजला नसेल. हे लोक योगींशी असहमत असण्यामागे या तीनपैकी एखादं कारण असू शकतं”.जनतेला कल समजून घ्यायला अजित पवारांना वेळ लागेल : फडणवीस उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
“केवळ अजित पवारांबद्दल बोलायचं झाल्यास ते गेल्या अनेक दशकांपासून अशा विचारांच्या लोकांबरोबर राहिले आहेत जे स्वतःला सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) म्हणवून घेत आले आहेत. त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष असल्याचं सांगत आले आहेत. परंतु, त्यांचं धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे हिंदूविरोधी असण्यासारखं आहे.
हिंदुत्वाचा विरोध म्हणजेच धर्मनिरपेक्षता अशी विचारधारा असलेल्या लोकांबरोबर अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून राहिले आहेत. त्यामुळे जनतेचा मिजास (कल), राष्ट्रवादी मिजास समजून घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागेल.देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राहिला प्रश्न ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा, तर, त्याचा अर्थ समाजाला एकत्र ठेवणे असा आहे. यात काहीही चुकीचं नाही. तसेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेला महामंत्र म्हटलं आहे.
कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण समाजाला एकत्र ठेवण्यासाठी एक मंत्र दिला आहे. आपण एकत्र राहिलो तरच आपला विकास होईल, असा त्यामागचा अर्थ आहे. काँग्रेस मात्र आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे.