कांदा कडाडला गावरान गोळे कांद्यास ७०१ रुपये भाव
1 min read
आळेफाटा दि.९:-जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात कांद्याचे भाव कडाडले असून शुक्रवारी (दि. ८) झालेल्या लिलावात उन्हाळी गावरान गोळा कांद्यास प्रति १० किलोस ७०१ रुपये कमाल भाव मिळाला. जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रीतम काळे यांनी ही माहिती दिली.आळेफाटा उपबाजारात काद्यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. शेतकरीवर्गान साठवून ठेवलेला बहुतांश कांदा विक्री केला आहे. यामुळे जुन्या कांद्याची आवक कमालीची घटली आहे. नवीन कांद्याचे विक्रीस येण्याचे प्रमाण कमी असल्याने भाव सध्या वाढले आहेत.
आळेफाटा उपबाजारात कांद्यास प्रतिदहा किलोस पाचशे रुपये भाव मिळत होता. मात्र, मंगळवारी (दि. ५) झालेल्या लिलावात भावात मोठी वाढ होऊन कांदा प्रतिदहा किलोस सहाशे रुपयांवर गेला,तर शुक्रवारी झालेल्या लिलावात पुन्हा भावात वाढ झाली.यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढण्याची चिन्हे आहेत.
कांदा आवक कमी झाल्याने भावात वाढ होत असल्याचे आळेफाटा उपबाजारातील अडतदारांनी सांगितले. शुक्रवारी झालेल्या लिलावात ४ हजार आठशे गोणी कांदा विक्रीस आला होता. यातील ९५० गोणी नवीन लाल कांद्याच्या असल्याचे सचिव रूपेश कवडे, कार्यालयप्रमुख प्रशांत महाम्बरे यांनी सांगितले.
कांद्यास दहा किलोला मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : एक्स्ट्रा गोळा गोळा ६८० ते ७०१ रुपये. सुपर ६६० ते ६८० रुपये. सुपर मीडियम ६४० ते ६६० रुपये. गोल्टी व गोल्टा : ६२० ते ६४० रुपये.बदला व चिंगळी: २५० ते ४०० रुपये.नवीन लाल कांदा : २०० ते ५०० रुपये.