बेल्ह्यातील शेतकऱ्याने पिकवला साडेपाच फूट लांबीचा भोपळा
1 min readबेल्हे दि.२४:- जुन्नर तालुक्याचे “जंगल मॅन” म्हणून ज्यांची ख्याती सर्वदूर असलेले गणपत औटी यांनी आपल्या ३० गुंठे निर्माण केलेल्या जंगलात चक्क साडेपाच फुट लांबीचा दुधिभोपळा पिकवलाय. या भोपळ्याची चर्चा तालुक्यात होत असून अनेक जण हा भोपळा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.या बाबत सविस्तर माहिती अशी की, बेल्हे (ता.जुन्नर) येथील गणपत औटी यांनी ३० गुंठे शेतात योग्य नियोजन करून अप्रतिम १५० ते २०० प्रकारच्या वनौषधीने शेती फुलवली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातुन त्यांनी औषधी वनस्पती गोळा केल्या आहेत. संपूर्ण शेंद्रिय शेती केली असून येथे झाडांचे कलम करून विविध प्रयोग केले जातात.त्यात त्यांनी दुधी भोपळ्याची लागवड केली होती.त्या भोपळ्याला साडेपाच फूट लांबीचे भोपळे येत आहेत.या शेतकऱ्यांने शेतात केलेले प्रयोग अफाट असून त्यातील वेगवेगळ्या उत्पन्नावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांनी आपली शेती ही कुठल्याही कृषी पर्यटना मागे टाकील एवढी देखणीच नव्हे तर उत्पादकही केली आहे. एक किलो पेक्षा मोठी फळ देणारी आंबा व नारळाचे झाड यांच्या बागेत आहेत.चार गुंठ्याच्या दोन चार वाफ्यातील झाडांतून वांगी कुठलंही कीटकनाशक न वापरता दीड टन उत्पादन काढतात हे त्यांनी दाखवून दिले आहे.रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मलबेरी हे उत्पादन तर शेतीच सार अर्थशास्र बदलून टाकणार आहे. संशोधनात कर्करोगावर गुणकारी ठरणाऱ्या अंबाडीच वाण त्यांनी विकसित केले आहे. एकेका झाडाला हजार भर बोंडे आणत त्यांनी उत्पादनाचे विक्रम मोडले आहेत. हे सार कुठल्याही सरकारी मदतीशिवाय त्यांनी स्वबळावरती विकसित केला आहे. कृषी खात्यातील तंबाखू चोळत बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी अशा प्रयोगाची गरज आहे पण ती औटी यांनी पूर्ण केली आहे.गणपत औटी यांच्या शेतात प्रवेश केल्यावर हिरव्या, लाल, काळ्या तुतीच्या (मलबेरी) च्या झुकलेल्या फांद्यां येणाऱ्याचे स्वागत होते. पूर्णपणे सेंद्रिय, एकदम नॅचरल, गांडूळ खतावर जोपासलेली ही शेती आहे. भुसभुशीत काळीभोर रवाळ माती, सशक्त गांडुळांचा खजिना येथे दिसतो. शंभरच्या वर जोपासलेली सशक्त दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पती येथे दिसतात. संपूर्ण मळ्याला तुती चे कंपाऊंड (नॅचरल वॉल) हिरव्यागार तुतीच्या सळसळणाऱ्या फांद्या पंख्याच्या वाऱ्यासारख्या दिसतात. या मळ्यात भरपूर तुतीची लागवड आणि त्याखाली जमिनीत लावलेली वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळे ती जस जशी तयार होऊ लागतात, तस तशी ती जमिनीच्यावर येऊ लागतात. एक तर १० किलो वजनाचे कंदमुळे येथे येतात. प्रभू श्रीराम आणि सीता वनवासात असताना आणि ऋषी मुनी ज्या कंदमुळांवर आपली उपजिविका करत होते ती सर्व आयर्न, कॅल्शियम, प्रोटीनयुक्त असणारी कंदमुळे प्रत्यक्षात या मळ्यात दिसतात. मळ्यामध्ये शेवगा, पपई, रामफळ, कढीपत्ता, लिंबू, आंबा, पेरू, नारळ, केळी, टोमॅटो, शेंगांचे वेल, ऊस, ड्रॅगन फ्रुट असे अनेक फळे आणि फळभाज्या आहेत.औटी त्यांचा मुलगा व पत्नी या तिघांनी ही शेती फुलवली आहे. २० वर्षांपूर्वी जमीन पाण्याच्या नियोजनासाठी चढउतार बघून विकसित केली. बोरवेलचे पाणी पाटांमधून मळाभर सोडलेले. कमीतकमी पाईपचा वापर करून सर्व झाडे, पालापाचोळा आणि कचऱ्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले. नुकत्याच मळ्यामध्ये २-३ पर्णकुटी उभारलेल्या आहेत. अगदी दगड, लाकडं, बांबू, गोणपाटं, नारळाच्या झावळ्या, सुतळ्या आणि कौलांनी उभा केलेल्या आहेत.येथे शेकडो विविध झाडे व औषधी वनस्पती आहेत.त्यामध्ये सफरचंद, आंबा, नारळ, विड्याची पाने, केळी, रामफळ, सीताफळ, सेवगा,डाळींब,घेवडा,वीदारा, टोमॅटो, वांगी, हळद, पाच प्रकारचे कंदमुळ, मलबेरी,सुपारी,आडुळसा,कृष्णतुळस,लवंग,माईनमुळा,जंगलीतुळस, आळु गवती चहा, कारली, आपाटा, रतनजोत, कलत्तापान सायकस,ऊस बेल रीठा,जासवंद,ऊंबर, कडुलिंब, घोसाळी, हदगा, तोंडवळी, काळाधोत्रा,अक्कलकाढा,ओवा, तान, कांडवेल,पेरु,भोकर,गुलाब,अंबाडी, पाथरी भाजी, चीकु, भुईआवळा,बिलायत, सफेदरुई,रान वांगे, तुर,कढीपत्ता, गुळवेल,ड्रगनफ्रुट,सोनचाफ,आवळा, इडलींबु,भोकर,खाजकुईरी, मीरची, चीत्रक, सदाफुली, अबोली, हारळीदुर्वा, नागरमेथा, दुधीभोपळा, रताळी, रानकेळ, स्टाँबेरी,सबजा,दोडका,कांडवेल,अडुळसा, अबोली, कांगुनीमाल, सोनचाफा,घयपात,वायगावहद ब्रंम्हकमळ, मेंहदी,डीडोनीया,पींपळ, डबलबी, मोगरा,अभय सेंग, पुदीना, ब्राम्ही, साफकांदा, संत्रा,मोसंबी,सायकस,ऊन्हाळदगडीपाला,गोकर्ण (सफेद, निळी), गुलछडी,झेंडु, पानफुटी, आले, चाफासफेद, सफेदगुंज,लालमाट,पालक,घानेरी,कँकटस,बोर,काळीमीरी,चींच आदी वनस्पती आहेत.