कोरठण खंडोबा ट्रस्टची घटना दुरुस्ती धर्मादाय उपायुक्तांकडून विश्वस्तांना नोटिसा जारी; ११ नोव्हेंबरला होणार सुनावणी!
1 min read
बेल्हे दि.४:- कोरठण खंडोबा देवस्थान लाखो भाविक भक्तांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असून राज्यस्तरीय “ब” वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. सदर देवस्थान ट्रस्टच्या घटनेत विश्वस्त नेमणुकीचे नियम, पात्रता, पद्धती बाबत नियमावली आणि देवाचे मानकरी खरे भक्त, ग्रामस्थ, मूळ मंदिराचे निर्माण करणाऱ्यांचे वारस यांच्यासाठी विश्वस्त पदाच्या जागा निश्चित करून घटनेतील कलमांमध्ये तशी दुरुस्ती करण्यात यावी असा प्रस्ताव खंडोबा भक्त गोरख जगताप, संभाजी जगताप, जनजी खोसे, गोपाळा घुले आणि संकल्प विश्वासराव (बेल्हे) यांनी धर्मादाय उपायुक्त अहिल्यानगर (अहमदनगर)
यांचेकडे मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० कलम ५० अ (३) नुसार देवस्थानचे भक्त व हितसंबंधी व्यक्ती म्हणून दाखल केलेला आहे.त्यावर धर्मादाय उपायुक्त उषा पाटील यांनी देवस्थानच्या सर्व विश्वस्तांना दिनांक २८/१०/२०२४ रोजी नोटीसा जारी करून दिनांक ११ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहणेस व म्हणणे देणेस आदेश केलेले आहेत.
श्री खंडोबा भक्त गोरख जगताप, संकल्प विश्वासराव (बेल्हे) यांनी सन २०२३ सालात देवस्थान ट्रस्ट विश्वस्तांना लेखी अर्ज देऊन घटनेत दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.परंतु देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी,विश्वस्त यांनी त्याबाबत काहीही निर्णय केला नाही.
देवस्थान ट्रस्टची मूळ घटना धर्मादाय आयुक्त यांनी सन १९९१ सालात तयार करून मंजूर केलेली आहे. त्यानुसार देवाचे भक्त व हित संबंधी व्यक्ती म्हणून सदरची घटना दुरुस्तीचा प्रस्ताव नियमानुसार धर्मादाय उपायुक्त यांच्या न्यायालयाकडे दाखल करण्यात आलेला आहे.
सदर देवस्थानच्या सण २०२२ साली, झालेल्या विश्वस्तांच्या नेमणुका राजकीय दबावाखाली झाल्यामुळे देवाचे मानकरी, देवस्थान मध्ये सेवा, भक्तीभाव, योगदान असणारे अर्जदार यांना निवड करण्यात आले नाहीत. म्हणून भाविकांमध्ये नाराजी आहे. बेल्हे गावचे मानकरी यांना विश्वस्त पदावर निवड केले नाही.
त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन बहिष्कार करून निषेध नोंदवला होता.देवी एकवीरा देवस्थान लोणावळा या ट्रस्टच्या विश्वस्त निवडीला मुंबई उच्च न्यायालयाने लागू केलेली नियम नियमावली कोरठण खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळ निवडीत लागू करण्यासाठी सदरच्या प्रस्तावातून ट्रस्टच्या घटनेत नवीन नियम व निवड पद्धतीची तरतूद दिली आहे.
श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टची घटना दुरुस्ती बाबतच्या सदर प्रस्तावावर ट्रस्टचे विश्वस्त मंडळ आता धर्मदाय आयुक्त न्यायालयापुढील सुनावणीत काय भूमिका घेणार, आणि धर्मादाय उपायुक्त या प्रस्तावातील नमूद घटनादुरुस्ती बाबत अंतिम निर्णय काय देतील याकडे सर्व भाविक भक्त, मानकरी यांचे लक्ष लागले आहे. अशी माहिती बेल्हे गावचे संकल्प विश्वासराव यांनी दिली.