गुळुंचवाडी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत सुपूर्द- आ. अतुल बेनके यांनी केला होता पाठपुरावा

1 min read

बेल्हे दि.१०:- गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथे १९ जुलै २०२४ रोजी कल्याण- नगर महामार्गावर भरधाव ट्रकने नागरिकांना चिरडल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. अपघातात मृत्यू पडलेल्या या पाचही जणांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ३ लाख रुपये अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झाले होते. या पीडित कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात आलेल्या आर्थिक मदतीचे धनादेश आ. अतुल बेनके यांनी सुपूर्द केले.ही घटना दि.१९ जुलै सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कल्याण – नगर महामार्गावर घडली होती. या अपघातात शितल योगेश दाते (वय ३०) व मुलगा रियांश योगेश दाते (वय ५, रा. आणे, ता. जुन्नर), दत्तात्रय लक्ष्मण गोसावी (वय ६२, रा. गुळुंचवाडी, ता. जुन्नर) यांचा जागीच तर नंदाराम पाटील बुवा भांबेरे (वय ८० रा. गुळुंचवाडी, ता. जुन्नर) व धोंडीभाऊ सदशिव पिंगट (रा. बेल्हे ता. जुन्नर) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता तर ८ ते १० जण गंभीर जखमी झाले होते.

“या अपघातात गुळुंचवाडी, बेल्हे व आणे गावातील काही जिवाभावाची माणसं आपण गमावली. खरं तर हे नुकसान आणि हानी कधीही न भरून येणारी आहे. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला आधार देणं हे आपलं कर्तव्य आहे. या पीडित कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी मी पाठपुरावा केला होता. पीडित कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झालेल्या ३ लाख रु. प्रत्येकी आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द केले. या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार” – आ. अतुल बेनके

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे