विद्यानिकेतन चे विद्यार्थी बनले शिक्षक; शिक्षक दिनी सांभाळला शाळेचा कारभार

1 min read

साकोरी दि.६:- जुन्नर तालुक्यातील साकोरी येथील विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी व पी.एम हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीच्या इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी, तसेच पी.एम हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिक्षकाची भूमिका पार पाडली. यासाठी सकाळच्या सत्रात विद्यार्थी शिक्षकांनी वेळापत्रकानुसार तासिका घेतल्या. सर्व विद्यार्थी शिक्षकांनी शाळेचे कामकाज अतिशय जबाबदारीने पार पाडले. त्यानंतर दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षकांनी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प व एक भेटवस्तू देऊन सन्मान केला. काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक दिनाचे महत्त्व तसेच शिक्षकांबद्दलचा आदर व्यक्त केला. त्यानंतर सर्व शिक्षकांसाठी संगीत खुर्ची हा मजेशीर खेळ घेण्यात आला व कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. या संपूर्ण कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना, विद्यानिकेतन इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या प्राचार्या रूपाली पवार (भालेराव) तसेच पी.एम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रमेश शेवाळे तसेच शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक पांडुरंग साळवे यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे