श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरात माता पालक संघाकडून सदिच्छा कार्यक्रम
1 min read
बेल्हे दि.२:- अलीकडील काळात समाजात महिलांबाबत घडत असलेल्या अनुचित प्रकारांच्या पार्श्वभूमीवर मुला- मुलींच्या मनात एकमेकांबद्दल सद्भावना निर्माण व्हावी, मुलींच्या मनातील असुरक्षिततेची भावना दूर होऊन विद्यार्थी विद्यार्थीनींमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी माता पालक संघातर्फे श्री बेल्हेश्वर विद्यालयात सदिच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक अजीत अभंग हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माता पालक संघाच्या उपाध्यक्षा कल्पना डुकरे, सदस्या वैशाली मटाले, रेशमा बनकर, शारमीन शेख, शिक्षक पालक संघाचे सदस्य मोहम्मद हुसेन इनामदार हे मान्यवर या वेळी उपस्थित होते.
शालेय शिक्षण विभागाच्या आदेशान्वये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी नुकतीच विद्यालयात सखी सावित्री समिती व माता पालक संघाच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. या समितींच्या कृती कार्यक्रम ध्येयधोरणानुसार विद्यालयात सदिच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माता पालक संघाच्या सचिव उपशिक्षिका अश्विनी गेंगजे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे प्रयोजन स्पष्ट केले. विद्यालयातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कल्पना पुरोहित हीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे महत्व यावर मनोगत व्यक्त केले. विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका स्मिता बांगर यांनी रक्षाबंधन सणामागील भौगोलिक व वैज्ञानिक तत्व स्पष्ट केले.
या वेळी शालेय मैदानावर सामूहिकरित्या मुलींनी मुलांना राख्या बांधल्या तर मुलांनी मुलींना शैक्षणिक वस्तू भेट म्हणून दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य अजीत अभंग आपल्या मनोगतात म्हणाले, ”मुला मुलींनी एकत्र शिक्षण घेत असताना एकमेकांबद्दल आदर बाळगावा.
पारंपारिक सण साजरे करण्यातून सुस्कांरित मने घडतील. माता पालक संघ व सखी सावित्री समितीच्या माध्यमातून स्री पुरूष समानता निर्माण होईल अशा उपक्रमांचे आयोजन केले जावे ” मुलींनी स्वसंरक्षणार्थ सक्षम बनावे अशी अपेक्षाही त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
सांस्कृतिक विभाग प्रमुख कोमल कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले तर जयश्री फापाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.