विघ्नहर सहकारी साखर कारखाना’ देणार उसाला ३२०० रुपये भाव:- चेअरमन सत्यशील शेरकर
1 min read
जुन्नर दि.१:- जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ गळीत हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाला ३ हजार २०० प्रति मे.टन विनाकपात बाजारभाव जाहीर करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ४२ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस सभासद, शेतकरी उपस्थित होते.
सभेचे कामकाज होण्यापूर्वी श्री विघ्नहर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.निवृत्ती शेरकर व स्व. सोपान शेरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात चेअरमन शेरकर यांनी विघ्नहर साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी मागील गाळप हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी, उत्पादन घेतलेले शेतकरी आदींचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला. यावेळी एकरी १३६ मे.टन ऊस उत्पादन घेणारे उल्हास जेजुरकर यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
विषय पत्रिकेवरील सर्व विषय उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूर केले. यावेळी सभासदांनी चेअरमन शेरकर व संचालक मंडळाचे कौतुक केले.
यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन शेरकर यांनी उत्तरे दिली. उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार कारखान्यास मिळाल्या बद्दल सभासदांच्या वतीने अभिजित बढे व विकास चव्हाण यांनी कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार केला.
यावेळी रामदास थोरात, जयवंत भोर, अविनाश हडवळे, सुधाकर डुंबरे, सुनील कवडे, तान्हाजी बेनके, आशा बुचके, विजय भोर, अंबादास हांडे, नाथा धुमाळ, निलेश बेनके, महेश शेळके, सुरेश वाणी, शरद सोनवणे, दिलीप गांजळे, अनघा घोडके आदी सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.
विषयपत्रिकेचे वाचन भास्कर घुले यांनी केले. आभार व्हाइस चेअरमन अशोक घोलप यांनी मानले.