मोठी बातमी! उद्याचा महाराष्ट्र बंद रद्द:- शरद पवार

1 min read

मुंबई दि.२३:- राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या शनिवारी (दि. 24 ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदची तयारी सुरु असतानाच आता हायकोर्टाकडून या बंदची परवानगी नाकारण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे.

वकील गुणरत्न सदावर्तेसह इतरांनी बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर तातडीची सुनावणी पार पडली. “कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी”, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

दरम्यान, हायकोर्टाच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (एसपी) पक्षाचे शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. पवार यांनी ट्विट केले असून त्यामध्ये म्हंटले आहे की, “बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या (दि. २४ ऑगस्ट) रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते.

त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता.

तथापि मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही.भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.”

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे