शाळेत मुलीला टेरेसवर नेऊन हातपाय बांधले; अज्ञाता विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा
1 min read
अहिल्यानगर दि.७:- शाळेतील एका १३ वर्षीय मुलीला टेरेसवर नेऊन तिचे हातपाय व तोंड बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.५) सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास पिंपळगाव उजैनी (ता. नगर) परिसरातील एका शाळेत घडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पिंपळगाव उजैनी येथील शाळेत शिक्षण घेत असलेली १३ वर्षीय मुलगी व तिची मैत्रीण स्वच्छतागृहात गेली होती.
मैत्रीण पुढे निघून आल्याने ही मुलगी एकटीच पाठीमागे राहिली. त्यावेळी शाळेच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून एक इसम आत आला. त्याने पाठीमागून बळजबरीने पकडून मुलीला स्वयंपाक खोलीत नेले. स्वयंपाक खोलीच्या बाहेरून शाळेतीलच काही मुले जात होती.
मुलांच्या लक्षात येऊ नये, म्हणून आरोपीने मुलीला शाळेच्या टेरेसवर नेले. तिथे त्याने मुलीचे तोंड कापडाने बांधले. हात व पाय तारेने घट्ट बांधून तो मुलीला सोडून निघून गेला. तोंड बांधलेले असल्याने मुलीला आवाज देता येत नव्हता.
तिने हाताच्या कोपरावर सरकत जाऊन कसाबसा आवाज दिला. शाळेच्या मैदानावर खेळत असलेल्या मुलांना ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी टेरेसवर जाऊन पाहिले असता सदरची मुलगी बांधलेल्या अवस्थेत दिसून आली. मुलांनी तिचे तोंड सोडल्यानंतर ती मोठमोठ्याने रडू लागली. मुलांनी हातपाय सोडून मुलीची सुटका केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.शाळकरी मुलीला बाहेरून आलेल्या मुलाने टेरेसवर नेऊन बांधून ठेवले की शाळेतील मुलांनीच है कृत्य केले.
याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी मंगळवारी गावात भेट देऊन मुलीच्या नातेवाइकांची चौकशी केली. मुलगी वापरत असलेला मोबाइलही पोलिसांनी ताब्यात घेतला असून, यातून काही धागेदोरे लागतात का, यादृष्टीनेही पोलिस तपास करत असल्याचे सांगण्यात आले.
प्रतिक्रिया
“शाळकरी मुलीला टेरेसवर नेऊन बांधल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मागील कारण अद्याप समोर आलेले नाही. मुलीला बांधण्यामागील कारण काय आणि तिला कुणी बांधले याचा पोलिस शोध घेत आहेत.”
माणिक चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक, एमआयडीसी