मी धमकी दिली तर महाराष्ट्रात फिरता येणार नाही :- मनोज जरांगे
1 min readजालना दि.५ :- मी जर धमकी दिली तर तुम्हाला महाराष्ट्रात कुठेच फिरता येणार नाही, असा थेट इशारा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी खासदार नारायण राणे यांना दिला. खासदार नारायण राणे यांनी मी मराठवाड्यात जाणार, जरांगे काय करतात ते बघुयात असे विधान करताना मनोज जरांगे यांना आव्हान दिले होते. त्यावर जरांगे यांनी थेट इशारा देताना नारायण राणे यांना सुनावले. भाजपनेते आणि माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे तसेच आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे मनोज जरांगे यांच्यावर सातत्याने टीका करीत आहेत. राणे पिता-पुत्रांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांच्याकडूनदेखील सातत्याने प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आजदेखील जरांगे यांनी राणे पिता-पुत्रांवर पुन्हा एकदा टीका करून थेट इशाराच दिला आहे.जरांगे म्हणाले, नारायण राणे यांच्यावर बोलायला सुरुवात केल्यास मागे सरकणार नाही. विनाकारण मला डिवचू नका, अशा शब्दांत त्यांनी थेट राणे पिता-पुत्रांना इशारा दिला. इतर कुणाच्याही नादाला लागा. मात्र, माझ्या नादाला लागू नका. मस्तीत सत्तेचा गैरवापर करू नका. नाही तर एकही जागा येऊ देणार नाही. शिस्तीत काम करा, असे ते म्हणाले.