रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल; हिंदू साम्राज्य दिन आणि पर्यावरण दिनानिमित्त; एक झाड – सह्याद्रीकारिता; एक झाड स्वराज्याकरिता उपक्रम

1 min read

आळेफाटा दि.१२:- छत्रपती शिवाजी महाराजांना सह्याद्रीतल्या वृक्षराजींबद्दल प्रचंड प्रेम होते. छत्रपतींच्या राज्यातील बहुतेक किल्ले हे घनदाट अशा जंगलांनी वेढलेले होते. या जंगलांचा ऱ्हास होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या सैन्यास स्पष्ट ताकीत दिलेली होती. सह्याद्रीतल्या या किल्ल्या भोवातालच्या जंगलाच्या आधारावर त्यांनी अनेक लढाया गनिमीकाव्याने लढल्या आणि जिंकल्याही. या जंगलाच्या मदतीनेच त्यांनी अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूचा देखील संहार केला. म्हणूनच छत्रपतींनी या जंगलांचे महत्व तेव्हाच ओळखले होते. परंतु हा आपला वारसा मात्र सद्य काळात नष्ट होत चालला आहे. वास्तविक पाहता प्रचंड उत्पादन क्षमता असलेले असे हे जंगल, त्यातून आपल्याला वर्षभर मिळणारे पाणी, या ठिकाणी उपलब्ध अनेक प्रकारची नैसर्गिक संसाधने, जागतिक स्तरावरील अत्यंत महत्वाच्या अशा मानल्या गेलेल्या. जैविक विविधतेचे अधिवास आणि या सर्वांवर अवलंबून असलेले सह्याद्रीतील आपल्या लोकांचे जीवन हे याचे वैशिष्ट्य आहे. सध्या बदलत्या वातावरणाच्या काळात सह्याद्रीवर होत असलेल्या आक्रमकांमध्ये बदल झालेला आहे व पर्यायाने त्याचा परिणाम हा यातील जल, जंगल, जमीन, जैव विविधता आणि यावर अवलंबून असलेल्या आपल्या सर्वांच्या जीवनावर होत आहे.

छत्रपतींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आपल्या भागात जंगल सांभाळण्यासाठीचा दिलेला वारसा पुढील पिढीस द्यायचा असेल तर छत्रपतींच्या कार्याचे स्मरण करून पुनश्च एकदा आपल्या सह्याद्रीला स्थानिक वृक्षवेलींनी समृद्ध करावे लागणार आहे. छत्रपतींचा राज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन हे त्याचे एक निमित्त आहे. आपण सर्वांनी या हिंदू साम्राज्य दिनानिमित्त स्थानिक भारतीय वृक्षाची लागवड करून त्याचा सांभाळ केला तर हळूहळू सर्वत्र सह्याद्रीतल्या वृक्षांची संख्या वाढीस लागू शकते. छत्रपतींच्या कार्याचे स्मरण आणि बदलत्या काळाची गरज ओळखून दरवर्षी प्रत्येकाने किमान एक तरी स्थानिक देशी प्रकारचे झाड लावायची गरज आहे. तरी आपणां सर्वांना विनम्र आवाहन आहे की येत्या २० जून २०२४ रोजी हिंदू साम्राज्यदिनानिमित्त आपण आपल्या संस्थेतर्फे ‘एक झाड – सह्याद्री करिता; एक झाड – छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याकरता’ असा संकल्प करूयात आणि एक तरी झाड लावूयात. यातूनच आपल्या येणाऱ्या पिढीला छत्रपतींच्या कार्याचे स्मरण करून देवूयात आणि आपला हा इतिहास जागृत ठेवूयात.असे आवाहन रो. विजयकुमार आहेर (अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल) यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे