रविवारी बँका सुरू राहणार, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय..!

1 min read

पुणे दि.२१:- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने मोठा निर्णय घेत रविवार, 31 मार्च रोजी देखील बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स पोस्ट करून या निर्णयाची माहिती दिली आहे.आरबीआयच्या निवेदनात म्हटलंय की, 31 मार्च 2024 रोजी रविवार असूनही सर्व बँका खुल्या राहतील. चालू आर्थिक वर्ष 2023-24 चा शेवटचा दिवस असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.आर्थिक व्यवहारांची नोंद याच आर्थिक वर्षात करणे आवश्यक आरबीआयने म्हटले आहे की, ‘आर्थिक वर्षाची वार्षिक समाप्ती 31 मार्च रोजी आहे. त्यामुळे सर्व बँका खुल्या राहतील. सर्व बँकांना पाठवलेल्या सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, आर्थिक वर्ष संपेपर्यंत होणारे व्यवहार याच वर्षी नोंदवले जावेत, त्यामुळे सर्व बँकांना काम करण्यास सांगितले आहे. रविवार, 31 मार्च रोजी सर्व बँका त्यांच्या नियमित वेळेनुसार उघडतील आणि बंद होतील. शनिवारीही सर्व बँका सुरू राहणार आहेत. याशिवाय NEFT आणि RTGS व्यवहारही रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय सरकारी धनादेश क्लिअर करण्यासाठीही विशेष तरतूद करण्यात येणार आहे. मात्र, शेअर बाजार बंद राहणार आहे.’यापूर्वी आयकर विभागाने आपली सर्व कार्यालये खुली ठेवण्याचा निर्णय घेतला होता. गुड फ्रायडेसह शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्याही विभागाने रद्द केल्या होत्या. गुड फ्रायडे 29 मार्च रोजी आहे. 30 मार्चला शनिवार आणि 31 मार्चला पुन्हा रविवार आहे. त्यामुळे 3 दिवसांची मोठी सुट्टी होती. त्यामुळे विभागाची अनेक कामे आर्थिक वर्षअखेर रखडणार होती. 2023-24 हे आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे 29, 30 आणि 31 मार्च रोजी देशभरातील आयटी कार्यालये सुरू राहतील,असे आयकर विभागाने म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे