आढळरावांचे दोन्ही दगडांवर पाय; शिवसेनेसह राष्ट्रवादीकडूनही शिरुरमध्ये लढण्याची तयारी!
1 min readलांडेवाडी दि.१:- उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिरूरच्या जागेवर दावा केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही जागा त्यांचेकडे जाऊ शकते किंवा शिवसेनेकडे येऊ शकते.
शिवसेनेकडे आल्यास मीच उमेदवार आहे; मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेल्यास मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर व राष्ट्रवादी पक्षाला मी उमेदवार म्हणून मान्य असेल तर तिकडेही जाऊ शकतो; परंतु मुख्यमंत्री शिंदे यांचा शब्द आपण अंतिम मानून निर्णय घेऊ, असे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले.लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (दि.२९) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारीवरून आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये होत आहे. याबाबत शिवसैनिक व कार्यकत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथे शिवसैनिक, पक्षाच्या कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावून कार्यकत्यांची मते आजमावून घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आढळराव पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, इरफान सय्यद, अरुण गिरे, सुनील बाणखेले, सागर काजळे, संतोष डोके, रवींद्र करंजखेले, सचिन बांगर, प्रवीण थोरात पाटील, योगेश बाणखेले, रवींद्र वळसे पाटील, स्वप्निल बॅड पाटील, शैलेश आढळराव पाटील यांसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.आढळराव पाटील म्हणाले, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून वेळप्रसंगी परिस्थितीनुसार निर्णय घ्या. पण निवडणूक लढवा, अशी शिवसैनिक व कार्यकत्यांची इच्छा आहे. पुढील चार-पाच दिवसांत जागा वाटप होतील. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ.