आरोग्य वार्ता! असं जपा आपल्या डोळ्यांच आरोग्य
1 min readजुन्नर दि.३१:- पंचेंद्रियांपैकी डोळे अतिशय महत्त्वाचे इंद्रिय आहे. सध्या डोळ्यांवर प्रचंड ताण असतो. आजूबाजूला असलेले प्रदूषण, धूळ, माती हे सगळं डोळ्यांमध्ये सतत जात असतात. सध्या सोशल मीडिया, इंटरनेट, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईलचा वापर खूप वाढलेला आहे. त्यामुळे सतत ताण येत असतो.
त्यातच झोपेचा अभाव, रात्री उशिरापर्यंत काम करणे यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होणे किंवा सूज येणे अशा समस्या उद्भवतात.सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे की, डोळ्यांसाठी जास्तीत जास्त अँटिऑक्सिडंट असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत. फळे आणि भाज्या यातून ते भरपूर प्रमाणात मिळत असतात.
संशोधनातून असे सिद्ध झालेले आहे की ल्युटिन, झीझेन्टिन, जीवनसत्त्व सी, जीवनसत्त्व ई आणि झिंक हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.ल्युटिन आणि झीझेन्टिन – अनेक संशोधनावरून असे स्पष्ट झाले आहे की, ल्युटिन आणि झीझेन्टिन डोळ्यांचे गंभीर विकार तसेच मोतीबिंदूचे प्रमाण कमी करायला मदत करतात.
हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, मका, वाटाणे यांच्यात या घटकांचे प्रमाण भरपूर असते.जीवनसत्त्व ई – जीवनसत्त्व ई आपल्या डोळ्यांना फ्री रॅडिकल्स म्हणजेच जे घटक आपल्या डोळ्यांच्या पेशींना घातक असतात, त्यांच्यापासून संरक्षण करतात. जीवनसत्त्व ई हे विविध तेलांमध्ये, करडईचं तेल, मक्याचे तेल यांच्यात असतं. तसंच ते आपल्याला अक्रोड, बदाम यातूनदेखील मिळतं.
जीवनसत्त्व सी – संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, जीवनसत्त्व सीदेखील मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी करते आणि जेव्हा हे बाकी इतर महत्त्वाच्या पोषक घटकांबरोबर घेतले जाते तेव्हा ते वयोमानाने होणारे मेक्युलर डी -जनरेशन कमी करायला प्रयत्न करते.
तसेच डोळ्यांचा दृष्टिदोषदेखील कमी करायला मदत करते. त्यासाठी आहारामध्ये संत्री, स्ट्रॉबेरीज, पपई, हिरव्या पालेभाज्या आणि टोमॅटो, आवळा हे सर्व असावे.जीवनसत्त्व अ – डोळ्यामध्ये एक rhodopsin नावाची प्रथिने असतात. त्यांच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो. बऱयाच फळे आणि भाज्या, जसे की गाजर, पालेभाज्या, यात बीटा केरोटिन असते.
झिंक – झिंकचे कार्य म्हणजे जीवनसत्त्व ‘अ’ हे यकृतातून रेटिनाकडे आणणे हे असते. ज्यामुळे मेलनिन नावाचे एक संरक्षक पिगमेंट डोळ्यांमध्ये तयार होते. दृष्टिदोष, रात्री कमी दिसणे, मोतीबिंदू हे सर्व झिंक कमतरतेशी संबंधित आहे. आपल्याला आहारातून हे झिंक जास्त करून मांसाहारातून मिळते, परंतु जे शाकाहारी आहेत.
त्यांना ते विविध प्रकारच्या ड्रायप्रूट्स, सुका मेवा आणि बिया जसे की, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया यातून मिळते.आवश्यक फॅटी ऑसिड – ओमेगा थ्री ऑसिड हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि डोळ्यातील पडद्याच्या कार्यक्षमतेसाठी गरजेचे असते. जास्त करून हे ओमेगा 3 फॅटी ऑसिड आपल्याला कोल्ड वॉटर फिशमधून मिळत असतात. हे डोळ्यातील दाहदेखील कमी करतात.