६ दिवसांत १९ लाख भाविकांनी घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन; पहिल्याच दिवशी सव्वातीन कोटींचे दान

1 min read

अयोध्या दि.२९:- अयोध्या येथील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून ६ दिवसांत १९ लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे कडाक्याची थंडी, धुके या कशाचाही परिणाम भाविकांवर होत नाही. उलट मंदिराबाहेर रांगाच्या रांगा लावून भक्त जय श्री रामच्या घोषणा देत होते.

अयोध्येतील राममंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भक्तांची रांग लागली आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर राम मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले. यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल ३ कोटी १७ लाख रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत, अशी माहिती रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी दिली.

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी १० दान काउंटर उघडण्यात आले होते. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर भक्तांनी दान काउंटर आणि ऑनलाइन देणगीच्या स्वरूपात ३.१७ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात २३ जानेवारीला पाच लाखांहून अधिक भक्तांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले. तर बुधवारीही तितक्याच संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. बुधवारी आणि नंतर किती देणगी मिळाली, हे मोजदाद केल्यानंतर सांगितले जाईल, असेही मिश्रा म्हणाले.

तसेच भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी प्रशासनासोबत चर्चा करून व्यवस्था केली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे