प्रभू श्री रामाच्या मूर्तीचा रंग काळा का आहे? बाल स्वरूपात मूर्ती का आहे? जाणून घ्या……
1 min readअयोध्या दि.२३:- अयोध्येत २२ तारखेला राम मंदिरात भगवान रामलल्लाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. ऐतिहासिक क्षण, शेकडो वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाली. भगवान श्री राम अयोध्येतील एका भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संघ प्रमुख मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत समुदाय आणि विशेष लोकांच्या उपस्थितीत रामललाच्या श्रीविग्रहाचा अभिषेक पूर्ण झाला.यावेळी प्रभू श्रीरामाला पिवळ्या रंगाचे पितांबरात परिधान केले होते. त्यांच्या हातात धनुष्य आणि बाण पाहायला मिळत आहे.
रामलल्लाने सोन्याचे चिलखत, कानातले आणि हार घातला आहे. तसेच रत्नजडित मुकुट आणि त्यांच्या गळ्यात सुंदर रत्नांची माला आहे. प्रभू रामललाचा कमरबंदही सोन्याचा आहे. रामललाच्या दागिन्यांमध्ये रत्न, मोती आणि हिरे यांचा समावेश आहे. सध्या रामलल्लाच्या मूर्तीची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
अनेकांना प्रश्न पडला आहे की, मूर्तीचा रंग हा काळा का आहे? त्यासोबतच बाल स्वरूपात मूर्ती का आहे? असं सवाल एकमेकांना विचारण्यात येत आहेत, तर आज याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत…..
प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीचा रंग का काळा?
महर्षी वाल्मिकी यांनी रामायणामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं वर्णन श्यामल रूपाचं वर्णन केलं आहे. त्यासोबतच ही मूर्ती श्याम शिला दगडापासून बनवण्यात आली आहे. हा दगड हजारो वर्षे चांगला राहू शकतो. त्यावर कोणताही परिणाम होत नाही.
कारण हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी अभिषेक होतो तेव्हा पाणी, चंदन किंवा दूध वाहिलं जातं. यासारख्या गोष्टींचा मूर्तीवर काही परिणाम होत नाही. आणि म्हणूनच या शिला पासून प्रभू श्रीरामाची मूर्ती तयार करण्यात आली आहे.
बाल स्वरूपात मूर्ती का बनवली?
प्रभू श्री रामाची मूर्ती बाल स्वरूपात बनवण्यात आली आहे. मान्यतेनुसार, जन्मस्थानात बाल स्वरूपाची पूजा केली जाते. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी तो एक दगड असतो. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा करून त्यामध्ये प्राण घालावे लागते. त्याशिवाय मूर्तीपूजा पूर्ण मानली जात नाही. मूर्तीची पूजा करून त्याचा अभिषेक केला जातो.