समर्थमध्ये ग्राहक संरक्षण कायदा व प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन
1 min readबेल्हे दि.१३:- अन्न नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन तहसील कार्यालय, जुन्नर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जुन्नर आणि राष्ट्रीय सेवा योजना समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग व समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहक संरक्षण कायदा व प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते.या कार्यशाळेची सुरुवात अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आली. स्वामी विवेकानंद व मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पर्यावरण समितीचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर उंडे,ग्राहक पंचायत जुन्नर तालुक्याचे संघटक शैलेश कुलकर्णी, तालुका संपर्क प्रमुख नंदाराम भोर. तालुका सहसंघटक कौशल्या फापाळे तसेच संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, बीसीएस कॉलेजचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, प्रशासकीय अधिकारी प्रदीप गाडेकर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.दिनेश जाधव, प्रा.भूषण दिघे, प्रा.गौरी भोर, प्रा.अश्विनी खटिंग तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्राहकांनी घरबसल्या आपली तक्रार ऑनलाईन नोंदवण्यासाठी ई-दाखिल प्रणाली चा वापर करावा असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी केले.युवकांनी पुढाकार घेऊन स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे. स्वतः समृद्ध झाल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना.आणि रोजगार वाढवण्यावर भर द्या असे आवाहन करण्यात आले. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने उद्योजक, व्यापारी, शासन, श्रमिक आणि शेतकरी या पाच घटकांनी एकत्रित येऊन अर्थव्यवस्थेचे चक्र मजबूत करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.सामान्य माणसाचे छळवणूक प्रशासनाकडून थांबविण्यासाठी, हेलपाटे, टोलवा टोलवी, दप्तर दिरंगाई, सहजपणे न समजणारे क्लिष्ट कायदे, प्रचंड भ्रष्टाचार यावर आपल्याला काम करायचे आहे. त्यासाठी दक्ष ग्राहकांच्या संघशक्तीची आज देशाला आवश्यकता आहे. प्रत्येक दक्ष ग्राहकाने ग्राहक डोळा उघडा ठेवावा असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी केले. शोषणमुक्त समाजाची निर्मिती,ग्राहकाभिमुख प्रशासन व संवाद समन्वयातून ग्राहक कल्याण हा विचार अखिल भारतीय ग्राहक पंचायत गेले पन्नास वर्षे सेवाभावी वृत्तीने समाजामध्ये पसरवत आहे. शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी देशातील तरुणांनी पुढे येऊन ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय चळवळीत सहभागी होऊन हे कार्य फौजी निष्ठेने चालविले पाहिजे.पर्यावरण समितीचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर मुंडे म्हणाले की,पर्यावरण संरक्षण करणे खूप गरजेचे आहे. ग्राहक म्हणजे काय याबाबत माहिती देऊन ग्राहक सुरक्षिततेचा हक्क, माहिती मिळवण्याचा हक्क, वस्तू निवडण्याचा हक्क आणि आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार डॉ.लक्ष्मण घोलप यांनी मानले.