सोनं महागलं, तेलाच्या किमतीतही वाढ; इस्रायल-इराण संघर्षाचा काय होणार परिणाम?
1 min read
मुंबई दि.१५:- भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकची संपूर्ण जगभरात चर्चा होत असताना इस्रायलने तशाच प्रकारचा हल्ला इराणमध्ये केला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, इस्रायलने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास इराणच्या तेहरानमधील अनेक लष्करी आणि आण्विक तळांना लक्ष्य केलं आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालं असून त्यांच्या लष्करप्रमुखांसह इतर महत्वाच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा इराणने दिला आहे. दरम्यान, इस्रायल व इराण यांच्यातील संघर्षामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांवर याचा नेमका काय परिणाम होणार, ते जाणून घेऊ…
इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर हल्ला करून तेथील आण्विक तळांना लक्ष्य केलं आहे. या सर्जिकल स्ट्राईकची माहिती स्वत: इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे. त्यांनी या हल्ल्यासंबंधीचं निवेदनही त्यांनी प्रसिद्ध केलं आहे.
दोन्ही देशांमधील या संघर्षानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ सुरू केल्याची घोषणा केली आहे. इस्रायलला असणारा धोका पूर्णपणे निपटून काढल्याशिवाय हे ऑपरेशन थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी एका निवेदनातून दिला आहे.
इस्रायल-इराण यांच्यातील संघर्षाचा आढावा इस्रायलच्या हल्ल्यात नतांजमधील युरेनियम संवर्धन केंद्रात स्फोट झाले, असे वृत्त इराणी माध्यमांनी दिले आहे. इस्रायलने इराणच्या लष्करी व आण्विक तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या आण्विक ताकदीचं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे.
इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्डचे प्रमुख हुसेन सलामी यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. इराणचे सशस्त्र दलांचे प्रमुख जनरल मोहम्मद बाघेरी हेदेखील इस्रायलच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत. इराणच्या आपत्कालीन आदेश दलाचा कमांडरचा आम्हा खात्मा केला,
अशी पोस्ट इस्रायली लष्कराने त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर केली आहे.इस्रायलचे संरक्षणमंत्री कॅट्झ यांनी देशात आपात्कालीन परिस्थितीची घोषणा केली आहे. इराणवर केलेल्या प्रतिबंधात्मक हल्ल्यानंतर इस्रायली नागरिकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याची शक्यता तत्काळ निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
इराणच्या गृहरक्षक दलाच्या कार्यक्षेत्रात विशेष आणीबाणीची स्थिती लागू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी एका निवेदनातून दिली आहे. इस्रायलवर हल्ला करण्यासाठी इराणने १०० हून अधिक ड्रोन पाठवले होते, मात्र आमच्या सैनिकांनी ते पाडले, असा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे.
दुसरीकडे, इराणने या हल्ल्याचा निषेध केला असून इस्रायलला चोख प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा दिला आहे.विमानसेवा विस्कळीत, अनेक मार्ग बंद इस्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये संघर्षाचा भडका उडाल्यानंतर इस्रायलने देशातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
एल अल (El Al) एअरलाइन्स सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत. दुसरीकडे, इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे, असे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले. दोन्ही देशातील वाढता तणाव पाहता एअर इंडियाने न्यूयॉर्क, व्हॅंकुव्हर, शिकागो आणि लंडन येथून येणाऱ्या विमानांचे मार्ग बदलले आहेत. इराक आणि जॉर्डननेही आपले हवाई मार्ग बंद केले आहेत.
कतार एअरवेजने दमास्कसकडे जाणारी दोन विमाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.इस्रायल-इराण संघर्षामुळे महागाईचा भडका उडणार? इस्रायल व इराण यांच्यातील संघर्षामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारण म्हणजे, इराणमधून संपूर्ण देशभरात कच्चे तेल निर्यात केले जाते. इस्रायलच्या हल्ल्यामुळे कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
यूएस क्रूड ऑईलची किंमत ८.२ टक्क्यानी वाढून प्रति बॅरल ७३.६१ डॉलर्सवर गेली आहे. दोन्ही देशांमधील तणाव आणखीच वाढल्यास, ‘स्टेट ऑफ होर्मूझ’ सामुद्रधुनी बंद होण्याची शक्यता आहे. ही सामुद्रधुनी ओमान आणि इराण दरम्यान असून ती पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडते.
कच्च्या तेलाचे दर वाढणार?
जगभरातील दररोज २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक ‘स्टेट ऑफ होर्मूझ’ सामुद्रधुनीतून केली जाते. ती बंद झाल्यास कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरेल १३० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे. सिंगापूरमधील अनेक तेल व्यापार्यांनी सांगितले की, होर्मुझची सामुद्रधुनी बंद होईल की नाही हे आताच सांगता येणं कठीण आहे. तेल वाहतूक आणि पुरवठ्यावर याचा परिणाम होईल का, हे इराणच्या पुढच्या कारवाईवर आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपावर अवलंबून आहे, असेही त्यांनी नमूद केले. भारतीय शेअर बाजारात पडझड तेलसमृद्ध पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठा हादरल्या असून,
भारतातील शेअर बाजारात घसरण आणि सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली आहे. शुक्रवारी सकाळी तेल आणि गॅस क्षेत्रातील समभागांच्या घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारात पडझड झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळी शेअर बाजार उघडताच निफ्टी ५० – १.२१ टक्याने घसरून २४,५८६.७ वर आली होती.
तर बीएसई सेन्सेक्स – १.२% नी घसरून ८०,७१०.५६ वर आला होता. MSCI Asia (जपान वगळून) निर्देशांकात १% घसरण झाल्याचं त्यात नमूद करण्यात आलेलं आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ होणार? इस्रायने इराणवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
शुक्रवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’च्या किंमती १.२% वाढून ३,४२३.३० डॉलर्स प्रति औंसवर पोहोचल्या आहेत. तर ‘अमेरिकन गोल्ड फ्युचर्स’मध्ये १.२% वाढ होऊन त्याच्या किमती प्रति औंस ३,४४४.५० डॉलर्सपर्यंत गेल्या आहेत. जर इराण व इस्रायलमधील संघर्ष आणखीच वाढला तर सोन्याचे दर झपाट्याने वाढू शकतात,
असं ‘KCM Trade’चे मुख्य विश्लेषक टिम वॉटरर यांनी रॉयटर्सला सांगितलं. ‘Geojit Investments Limited’चे प्रमुख गुंतवणूक धोरणतज्ज्ञ डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी ‘Economic Times’ला सांगितले की, जर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला तर त्याचे आर्थिक परिणाम होऊ शकतात.
“या संघर्षाचा बाजारावर किती खोलवर परिणाम होईल, हे तो संघर्ष किती काळ चालतो यावर अवलंबून आहे. अल्पकालीन कालावधीत बाजार ‘जोखीम-टाळण्याच्या’ (risk-off) मोडमध्ये राहील. तेलावर आधारित असलेल्या क्षेत्रांना याचा मोठा फटका बसू शकतो. दुसरीकडे तेल उत्पादक कंपन्या जसे की
ONGC आणि India Oil तुलनेत स्थिर राहतील. निफ्टी निर्देशांकाला २५,५०० च्या पातळीवर मजबूत आधार मिळण्याची शक्यता आहे,” असंही डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी स्पष्ट केलं.