दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति लीटर मिळणार पाच रुपयांचं अनुदान:- दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
1 min readमुंबई दि.२१:- राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दुधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे, अशी घोषणा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार आहे.
सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लीटर किमान २९ रुपये दूध दर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रोख जमा करणं बंधनकारक आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत ५ रुपये प्रति लीटर अनुदान बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. त्याची पडताळणी करणं आवश्यक राहील. ही योजना १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी लागू राहणार आहे.
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे मंत्री विखे पाटलांनी सांगितले.