कस्टम अधिकारी बापू लामखडे यांच्या ४५ वे पुण्यस्मरण; मंगरूळ गावात विविध कार्यक्रम
1 min read
बेल्हे दि.१७:- जमादार बापु लक्ष्मण लामखडे यांच्या ४५ व्या पुण्यस्मरणा निमित्त त्यांच्या जन्म गावी मंगरूळ (ता.जुन्नर) येथे रविवार दि.१८ रोजी विविध कार्यक्रम संपन्न झाले.
कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य अशोक घोडके, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी चव्हाण, संभाजी चव्हाण यांच्या शुभहस्ते सकाळी अभिषेक करण्यात आला.
त्यानंतर किर्तन सेवा हभप राजाराम महाराज जाधव यांची झाली. जमादार बापु लक्ष्मण लामखडे प्रतिष्ठान मंगरुळ यांच्या वतीने यंदाचा जमादार बापु लक्ष्मण लामखडे गुण गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट किर्तन सेवा अखंड ४५ वर्ष, प्रती कोंडाजीबाबा शिवनेर भुषण हभप राजाराम महाराज जाधव यांना गौरविण्यात आले.
या वेळी शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, कात्रज दुध संघ संचालक बाळासाहेब खिलारी, माजी पंचायत समिती सदस्य जयवंत घोडके, गावच्या लोकनियुक्त संरपच तारा लामखडे, आणे गावच्या सरपंच प्रियंका दाते, रानमळा गावच्या सरपंच सविता तिकोणे,
गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, प्रतिष्ठान चे अध्यक्ष कैलास लामखडे, कार्याध्यक्ष डॉ. बी. जी. लामखडे, संजय लामखडे, प्रदीप पिंगट, मोहन मटाले, निलेश लामखडे चेअरमन, खंडु खुटाळ व्हा. चेअरमन मांजरवाडी, खोडद, हिवरे, लोणी, नारायणगाव येथील ग्रामस्थ उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दता लामखडे यांनी केले तर आभार डॉ.बी.जी लामखडे यांनी मानले. उपस्थित मान्यवर सत्कार व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
जमादार बापू लामखडे हे मुंबईच्या १९६० / ७० च्या दशकांचे महानायक होते. त्यांनी आपल्या अतुलनीय शौर्यानं इतिहास घडवून, मुंबईच्या गुन्हेगारी साम्राज्यावर कायद्याचा वचक व जरब निर्माण करून मुंबईच्या इतिहासात बनून गेले.
जमादार बापू लक्ष्मण लामखडे ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष दि २ जुलै २०२१ ते २ जुलै २०२२ साजरी करण्यात आली. इतिहासाच्या पानांत हरवलेले एक दुर्लक्षित सोनेरी पान म्हणजे कस्टम अधिकारी जमादार बापू लक्ष्मण लामखडे. बॉलिवूडच्या चित्रपटांमधून दाखवले जाते की १९६० ते १९७० हे दशक म्हणजे मुंबईच्या अंडरवर्ल्डचा सुवर्ण काळ होता.
ह्याच काळात मुंबईमध्ये दारु , मटका, स्मगलिंगसारख्या अवैध धंद्यातील गुन्हेगारांचा उदय झाला आणि त्यांनी मुंबईला वेठीस धरले. परंतु हे सगळे म्हणजे अंडरवर्ल्डला ग्लोरिफाय करण्यासाठी केलेला उपद्व्याप होता.
मुळात मुंबईच्या कस्टम विभागात अशी एक तोफ धडाडत होती, जिचा आवाज ऐकताच मुंबईच्या सगळ्या स्मगलर्स भाई लोकांच्या उरात धडकी भरायची.
त्या तोफेचे नाव म्हणजे जमादार बापू लक्ष्मण लामखडे… दिनांक २ जुलै १९२२ रोजी महाराष्ट्राच्या जुन्नर तालुक्यातील मंगळूर-पारगाव या खेडेगावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बापू लामखडेंचे वडील प्लेगच्या साथीत वारले. त्यांचा थोरला भाऊ मुंबईच्या गोदीत काम करायचा तर बापू शेतामध्ये शेळ्या चारुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.
थोडासा मोठा झाल्यानंतर बापूने देखील मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेऊन मुंबईच्या गोदीची वाट धरली. तीन-चार वर्षे छोटी मोठी काबाडकष्टाची कामे करुन १९४४ साली वयाच्या २२ व्या वर्षी बापू मुंबई कस्टम्स मध्ये शिपायाच्या पदावर भरती झाले. बापू म्हणजे मुंबईच्या कस्टम विभागातील बहिर्जी नाईकच…!
बापू म्हणजे इतके जबरदस्त रसायन होते की भारतीय कस्टम्स विभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सरकारी पुस्तिकेमध्ये बापूजवळ अतींद्रिय शक्ती असल्याची नोंद करण्यात आली आहे. आपल्या या कामगिरीने बापूने त्या काळात सिंगापूर, हॉंगकॉंग पर्यंतच्या गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवून दिली होती.
तेव्हापासून मुंबईच्या स्मगलिंग विश्वात बापूच्या नावाची दहशत पसरली होती. त्यांना दोनदा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मुंबईच्या कस्टम विभागालाही बापूंच्या माध्यमातून पहिल्यांदा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.