जुन्नर व शिरूर तालुका ड्रग्जचा अड्डा; शिरूर मध्ये १७४ किलो ड्रग्ज जप्त; कंपनी सील, दोघांना अटक
1 min read
शिरूर दि. १३:- जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव या गावात मुंबई येथील अमली पदार्थ नियंत्रण (नार्को टिक्स) विभागाने मागच्या आठवड्यात मोठी कारवाई केली. यात मोठ्या प्रमाणावर ड्रम्स व इतर साहित्य जप्त करण्यात आले होते.
त्या पाठोपाठ शिरुर (जिल्हा.पुणे) तालुक्यातील मिडगुलवाडी येथे नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने छापा टाकत कंपनीवर केलेल्या कारवाईमध्ये तब्बल १७४ किलो ड्रग्ज जप्त करुन कंपनी सील करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईने शिरूर तालुका हा ड्रग्जच्या लिस्टवर आला आहे. हा अड्डा कारवाईच्या रडारवर आल्याने अमली पदार्थांची पाळेमुळे खोलवर रूजल्याचे दिसून येत आहे.
मिडगुलवाडी येथे एका फिनेल बनवणाऱ्या कंपनीवर नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने उपस्थितीत गोपनीय पद्धतीने छापा टाकला. मात्र, यावेळी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
याठिकाणी छापा टाकत तब्बल तीस तासांहून अधिक कारवाई सुरु ठेवण्यात आल्याने पोलीस देखील चक्रावून गेले, दरम्यान, येथे मोठ्या प्रमाणात केमिकल आढळून आल्याने कोणालाही काही समजत नव्हते तर गावातील लोक या पत्र्याच्या शेडमध्ये फरशी पुसण्याचे फिनेल हे केमिकल बनवले जात असल्याचे सांगू लागले.
हे शेड व कंपनी अतिशय जंगलात असल्याने कोणालाही काही माहिती नव्हती. कंपनीच्या कडेने असलेले पत्रा कंपाउंडचे गेट देखील कधीही उघडे दिसले नव्हते. नार्कोटिक्स पथकाने टाकलेल्या छाप्यात तब्बल १७४ किलो अल्प्राझोलम नामक ड्रग्ज व आदी साहित्य जप्त करुन संपूर्ण कंपनीचे मुख्य शटर तसेच गेट सील केले आहे.
यावेळी दोघांना अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स विभागाकडून कारवाई करीत असताना शिक्रापूर पोलिसांना देखील कोणतीही माहिती दिली नाही. याविभागाने केलेल्या कारवाईमध्ये शेकडो लिटर केमिकल ओतून देत काही साहित्य जाळून नष्ट केले आहे.
त्या कंपनीचे शेड मागे केलेल्या मोठ्या दोन खड्डयामध्ये काही केमिकल व ड्रग्ज सदृश पदार्थ दिसत असून शेडच्या परिसरात सध्या उग्र वास येत आहे. मात्र, कारवाईने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे.