मुंबईत अग्नीतांडव; ८ जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई दि.६: मुंबईतील (गोरेगाव) परिसरातील जय भवानी या इमारतीमध्ये आज शुक्रवार दि.६ पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून ३५ ते ४० जण अत्यवस्थ आहेत. या सर्व जखमींना उपचारासाठी कुपर आणि एचबीटी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पहाटे अडीच ते पावणेतीनच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाला तीन वाजून पाच मिनिटांनी आग लागल्याची वर्दी मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याच्या कार्याला सुरुवात केली.
मात्र, तोपर्यंत आग इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरली होती. ही एसआरए बिल्डिंग पाच मजली आहे. या इमारतीच्या पार्किंगमध्ये कपड्याच्या चिंध्यांची गाठोडी ठेवली होती. यापैकी काही कापडी चिंध्यांना आग लागली. आग लागल्यानंतर काही क्षणांमध्येच आगीने पार्किंगचा परिसर कवेत घेतला. यामध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या ३० दुचाकी आणि चारचाकी वाहने जळून खाक झाली.
कापडी चिंध्यांना लागलेल्या आगीमुळे काळा जाड धूर हा इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत जाऊन पोहोचला. खाली आग लागल्याने इमारतीमधील रहिवाशांना खाली येत आले नाही. अखेर अग्निशमन दलाने या सर्वांची सुटका केली. मात्र, तोपर्यंत काळा धूर नाकातोंडात गेल्याने अनेक रहिवाशांची प्रकृती बिघडली.
सध्या अग्निशमन दलाने आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले असून कुलिंगचे काम सुरु आहे. मात्र, यानिमित्ताने मुंबईच्या इमारतींमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर ठिकाणी भेट दिली व रुग्णालयातील जखमीची विचारपूस केली असून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना केंद्र सरकारने २ लाख तर राज्य सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.