डी.जे.च्या ठोक्यामुळे थांबला तरुणाच्या हृदयाचा ठोका; गणपती विसर्जन मिरवणुकीतील दुर्दैवी घटना
1 min read
तासगाव दि.२८:- कवठेएकंद (सांगली. ता. तासगाव) येथील गणेश विसर्जनाची मिरवणूक बघायला गेलेल्या
शेखर सुखदेव पावशे (वय ३२) याचा डिजे चा आवाज सहन न झाल्याने हृदयाचे ठोके बंद पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दि.२५ रात्री घडली.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठेएकंद येथे रात्री अनेक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होते. विसर्जन मिरवणुकीवेळी बहुसंख्य मंडळांनी डी.जे.ची व्यवस्था केली होती. सहा वाजता चौका-चौकांत कानठळ्या बसविणाऱ्या कर्णकर्कश आवाजात डी.जे. सुरू झाले. ध्वनी व्यवस्थेसमोरच तरुणांचा धिंगाणा सुरू होता.
रात्र सरेल तशी डी. जे. चालकांमध्ये कुणाचा आवाज मोठा, याची स्पर्धा लागली. आवाजामुळे संपूर्ण गाव हादरत होते. मिरवणुका स्टैंड चौकात आल्यानंतर तेथे असलेल्या शेखरला डी. जे. चा आवाज सहन झाला नाही. डी.जे.चा त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. छातीत दुखू लागल्याने त्याला तासगाव येथे एका खासगी रुग्णालयात नेले; पण उपचारांपूर्वीच डी. जे. च्या प्रचंड आवाजामुळे हृदयविकाराचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
त्याचा शेखर याचा पलूस येथे गाड्यांच्या बॉडी दुरुस्तीचा व्यवसाय होता. कमी वयात उद्योजक म्हणून त्याने नाव मिळवले होते. काही वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले आहे. त्याला चार वर्षांची मुलगीही आहे.या धक्कादायक प्रकारामुळे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आवाजावर नियंत्रण ठेवले असते, तर कदाचित हा प्रकार घडला नसता, शेखरचा जीव वाचला असता, अशी चर्चा कवठेएकंद येथे सुरू आहे.