महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत; नेत्यांची जेवणाची प्लेट साडेचार हजारांची

मुंबई, दि.१ – मुंबई येथे होत असलेल्या विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. गुरुवार (३१ ऑगस्ट) आणि शुक्रवार (१ सप्टेंबर) रोजी मुंबईत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या खर्चाची उजळणी मंत्री सामंत यांनी केली आहे. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ‘इंडिया’च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी बोलताना सामंत यांनी म्हटले, ४५ हजारांच्या ६५ खुर्च्या या बैठकीसाठी मागवण्यात आल्या आहेत. चौदा ते पंधरा तासांच्या बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो होतो, तेव्हा आमच्या हॉटेलचा खर्च काढण्यात येत होता. ग्रँड हयातमधील एका खोलीचा दर हा २५ ते ३० हजार रुपये इतका आहे.
तर जेवणाचे एक प्लेटही साडेचार हजार रुपयांची असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे जे १४ तासांसाठी एवढा खर्च करतात त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले. यादी हॉटेलकडे गेली आहे त्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष २६ व्या स्थानावर आहे.
तर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष २५ व्या स्थानी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे पक्ष हे शेवटून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असल्याचेही यावेळी सामंत म्हणाले. इंडिया आघाडीवर निशाणा साधताना सामंत पुढे म्हणाले, मुंबईत असंतुष्टांचा मेळावा भरतोय. देशाचे नाव राजकारणासाठी वापरणे हे दुर्दैवी आहे.
लोकसभा निवडणुका झाल्यावर ‘इंडिया’ संपुष्टात येणार आहे. ज्यांनी बाळासाहेबांवर टीका केली त्यातील अनेक पक्षांचा समावेश या इंडियाच्या आघाडीमध्ये आहे, असेही सामंत यावेळी म्हणाले आहेत.