आणे पठारावरील शेतकऱ्यांचे विद्युत पंप, स्टार्टर, केबल चोरणाऱ्या दोघांना आळेफाटा पोलिसांनी केली अटक
1 min read
आणे दि.१९:- पेमदरा (ता. जुन्नर) येथून शेतकऱ्यांचे मोटार, स्टार्टर व केबल चोरणाऱ्या दोघांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आणे पठारावरील पेमदरा येथील शेतकऱ्यांच्या बोअरवेल व विहिरीतील मोटार, केबल, स्टार्टर हे चोरीला जात असल्याची घटना समोर आली होती.१७ व १८ जुलै २०२३ मध्ये प्रकाश खंडू दाते (रा.पेमदरा) यांची HP ची मोटार, केबल चोरीला गेले होती. या चोरीच्या घटना वाढत असल्याने त्यांनी १६ ऑगस्ट रोजी आळेफाटा पोलिसांत फिर्याद दिली होती. आळेफाटा पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लावली असता काही धागेदोरे हाती लागताच पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
खाकी च्या धाकाने आरोपी पोपटासारखे बोलू लागले व गुन्ह्यांची कबुली दिली.चोरी केली मोटार त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केली. आकाश भागाजी दाते (वय २४ रा.पेमदरा ता. जुन्नर) व शुभम बाळासाहेब बीलबिले (वय १९ राहणार कर्जुले हर्या ता. पारनेर जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे असून सदर घटनेचा तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित पोळ हे करत आहेत.