पूर्व मान्सूनसाठी हवामान पोषक; राज्यात आज वादळी पावसाचा इशारा
1 min read
मुंबई दि.२८:- मान्सूनचे वेध लागलेले असतानाच महाराष्ट्रात पुन्हा वारं फिरलं आहे. पूर्व मान्सूनसाठी हवामान पोषक होत असून अर्ध्या महाराष्ट्राला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 22 जिल्ह्यांना सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाचा अलर्ट आहे.
विशेष म्हणजे 28 मार्च रोजी 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाचा रेड अलर्ट आहे.कोकणात उष्ण आणि दमट हवामान स्थिती कायम आहे. मुंबई, ठाणेसह रायगड आणि पालघर परिसरात आज यलो अलर्ट दिला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक गडगडाटी पावसाची शक्यता आहे.
कमाल तापमान 35-36 अंशांच्या दरम्यान राहील. मुंबईसह उपनगरांत उष्णतेच्या लाटेचा धोका असून सायंकाळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रावर वादळी पावसाचं संकट आहे.पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत ताशी 30-50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच तुरळक ठिकाणी विजांसह गडगडाटी पाऊस होईल.
घाट भागात पावसाची तीव्रता जास्त राहण्याची शक्यता आहे.कमाल तापमान 35-40 अंश सेल्सिअस राहील. उत्तर महाराष्ट्रात आज हवापलट होण्याची शक्यता आहे. नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह हलका पाऊस होईल. कमाल तापमान 38-42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. तर नाशिक घाट भागात देखील पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील काही भागात आज ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह गडगडाटी पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि बीड जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कमाल तापमान 38-42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.
उष्णतेचा तडाखा आणि प्रचंड उकाडा जाणवेल. विदर्भात उष्णतेचा कहर सुरूच आहे.आज नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया आणि वाशिम या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
या ठिकाणी उष्णतेच्या लाटेसोबत ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहून गडगडाटी पावसाचा धोका आहे. तसेच अकोला, अमरावती, भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असेल. कमाल तापमान 40-44 अंश सेल्सिअस राहील.
