अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर एसटी व दुचाकी अपघातात ४ ठार

1 min read

ओतूर दि.२५:- डिंगोरे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत रविवार दि.२४ आठ साडेआठ वाजेच्या सुमारास एस.टी. आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.या अपघातात दुचाकी वरील चारही तरुण ठार झाले.या अपघातातील आशिष ढवळु भले (वय २४, रा. मराडवाडी, फाळुकदरा, डिंगोरे ता. जुन्नर), दिपक सखाराम भले (वय २८, रा. मराडवाडी, फाळुकदरा, डिंगोरे ता. जुन्नर, शिवराम नारायण पारधी (वय २६, रा. आंबेदरा, डिंगोरे ता. जुन्नर), खंडु नारायण भले (वय २५, रा. आंबेदरा, डिंगोरे ता. जुन्नर) यांचा मृत्यू झाला आहे. विठ्ठलवाडी-पाथर्डी एस.टी. बस (क्र. MH 20 BL 2983) ही माळशेज घाट मार्गे ओतूरच्या दिशेने येत होती. याच वेळी ओतूरच्या दिशेकडून डिंगोरेकडे एकाच दुचाकीवरून (स्प्लेंडर क्र. MH 14 MA 7849) चार तरुण चालले होते. महामार्गावरील हॉटेल जीवनदीपच्या थोडे पुढे येताच एस.टी. बस आणि दुचाकीची समोरासमोर अत्यंत जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा पार चक्काचूर झाला आणि चारही तरुण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या तरुणांपैकी तिघांना तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. तर चौथ्या तरुणाला तातडीने आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु तेथील डॉक्टरांनीही त्याला मृत घोषित केले.भीषण अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली. या अपघाताबाबत ओतूर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू असून, पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!