पाक मध्ये क्वेटामध्ये पॅसेंजर ट्रेनजवळ भीषण आत्मघाती स्फोट; २३ जण ठार, ४७ जण जखमी

1 min read

क्वेटा दि.२५:- पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे एक भीषण घटना घडली आहे. क्वेटा येथील चमन फाटक परिसरात एका पॅसेंजर ट्रेनला लक्ष्य करून करण्यात आलेल्या आत्मघाती बाँम्ब हल्ल्यात किमान २३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर,४७ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक तपासानुसार, जास्तीत जास्त जीवितहानी करण्याच्या उद्देशाने रचलेला हा एक पूर्वनियोजित कट होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, क्वेट्टा कॅन्टहून सुटलेल्या एका स्थानिक शटल ट्रेनला चमन गेटजवळ पोहोचताच लक्ष्य करण्यात आले. हल्लेखोराने रेल्वे रुळाच्या अगदी जवळ स्वतःला उडवून दिले. हा स्फोट इतका भयानक होता की चालत्या ट्रेनचे इंजिन आणि त्यामागील तीन डबे थेट रुळावरून खाली घसरले. यातील दोन डबे तर पूर्णपणे उलटले, ज्यामध्ये प्रवासी अडकून पडले. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या पार्किंगमधील १० हून अधिक वाहनांचेही या स्फोटात मोठे नुकसान झाले असून, आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटून हवेत उडाल्या.रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळ हा भीषण स्फोट घडवून आणण्यात आला. ज्यावेळी पॅसेंजर ट्रेन या मार्गावरून जात होती, नेमकी तीच वेळ साधून हा स्फोट करण्यात आला. स्फोट इतका तीव्र होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या स्फोटात ट्रेनमधील आणि रेल्वे ट्रॅक परिसरातील नागरिकांचा आपला जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.सुरक्षा दलांनी तातडीने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून सुरक्षा कडक केली आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने आपत्कालीन बचाव पथकाने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून या आत्मघाती हल्ल्याचा सखोल तपास केला जात आहे.स्फोटाचे नेमके कारण आणि आत्मघाती हल्लेखोराचे धागेदोरे शोधण्यासाठी घटनास्थळा वरून पुरावे गोळा केले जात आहेत. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, मात्र पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!