एकरी शंभर टन ऊस उत्पादन शक्य:- तज्ञ संचालक विकास चव्हाण
1 min read
बोरी खुर्द दि.२४:- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना आयोजित शेतकरी मेळावा नुकताच बोरी खुर्द-साळवाडी (ता.जुन्नर) येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना कारखान्याचे तज्ञ संचालक विकास चव्हाण यांनी योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकरी शंभर टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादन घेणे शक्य असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी बोलताना चव्हाण यांनी जमिनीची सुपीकता टिकविणे, सरीतील योग्य अंतर राखणे, शुद्ध व दर्जेदार बियाण्याचा वापर, सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब, ठिबक सिंचन पद्धतीचा प्रभावी वापर, माती परीक्षणाच्या अहवालानुसार संतुलित खत व्यवस्थापन तसेच पिक संरक्षणाच्या आधुनिक उपाययोजना यांचा अवलंब केल्यास ऊस उत्पादनात मोठी वाढ करता येते, असे सांगितले.
सध्या विविध शेतमालाच्या बाजारभावातील मंदीची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी अधिकाधिक उसाची लागवड करून आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या मेळाव्यात सुभाष मोरे यांनी हिरवळीच्या खतासाठी ताग आणि धैचा लागवडीचे महत्त्व लागवड पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच कारखान्याचे ऊस विकास अधिकारी संदीप मोरडे यांनी कारखान्याच्या विविध योजना व ऊस लागवड धोरणाची माहिती शेतकऱ्यांना दिली.या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक प्रकाश जाधव, माजी संचालक तबाजी शिंदे, माजी उपसरपंच संतोष काळे,
सुदाम काळे, रामदास काळे, सेंद्रिय शेती तज्ञ बाबाजी बांगर, उत्तम जाधव तसेच परिसरातील बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार माजी उपसरपंच सुरेश काळे यांनी मानले.
