जुन्नर मधील बारव, शिवकालिन पाणी योजनेचे संवर्धन करा ‘सह्याद्री’ सह आमदार सोनवणे यांची सांस्कृतिक मंत्र्यांकडे मागणी बारव संवर्धन समितीची बैठक नुकतीच संपन्न

1 min read

जुन्नर दि.२१:- प्राचिन जुन्नर शहराची पाणीपुरवठा योजना मोगल काळातील नगररचनाकार, वास्तुविशारद मलिक अंबर यांनी तयार केली आहे. मात्र काळाच्या ओघात आणि वाढत्या शहरिकरणामुळे ही पाणी योजना लुप्त होत आहे. या पाणी योजनेवरील तलाव, बारव शेवटच्या घटका मोजत आहेत. यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारच्या बारव संवर्धन योजनेत याचा समावेश करावा. अशी मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेसह आमदार शरद सोनवणे यांनी सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे केली आहे. प्राचिन जुन्नर शहर वसवताना नगररचनाकार मलिकंबर यांनी पाणीपुरवठा योजना केली. यासाठी जुन्नर शहराच्या भोवती पद्मावती आणि बादशहा तलावांची उभारणी केली. या पाणी योजनेद्वारे जुन्नर शहरात खापराच्या पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा केला होता. यानुसार प्रत्येक पेठेतील प्रत्येक घरात आड होते. या आडांना साफपण पद्धतीने पाणी पुरवठा होत होता. यासाठी जुन्नर शहरात सय्यदवादा आणि बारव परिसरात बारव बांधण्यात आली होती. मात्र आता शहरिकरणामुळे हि पाणी योजना अखेरच्या घटका मोजत आहे. मात्र काही ठिकाणी या पाणीयोजनेचे अवशेष शिल्लक असून, अजुनही याला पाणी येत आहे. शहरातील वाढते शहरीकरण आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी बारव आणि मलिकंबर नहर चे संवर्धन व्हावे असे आमदार सोनवणे यांनी सांगितले.दरम्यान राज्याच्या बारव संवर्धन समितीची बैठक नुकतीच सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घेतली. या बैठकीत बारव संवर्धनाच्या कामात येणाऱ्या अडचणी, आवश्यक उपाययोजना तसेच शासन आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती कार्यक्रम तयार करावा. तसेच बारव परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. तसेच बारव संवर्धनासाठी कार्यरत संस्था, अभ्यासक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी घटक यांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यशाळा व शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आणि प्रशिक्षण क्षेत्रातील अनुभवी संस्थांचे सहकार्य घेण्याबाबत सूचना केल्या.त्याचबरोबर राज्य शासनाच्या ‘मित्रा’ संस्थेमार्फत जागतिक बँकेकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून बारव संवर्धनासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे या बैठकीत सांगितले. यावेळी बारव संवर्धनासाठी कार्यपद्धती निश्चित करणारे परिपत्रक जारी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. समिती सदस्यांचा सहभाग, जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय, जिल्हा नियोजन निधीतून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये पुरातत्व संवर्धनाचे निकष पाळणे, समितीच्या नियमित बैठकींचे वेळापत्रक निश्चित करणे आदी बाबींवर भर देण्यात यावा, असे सांगितले.या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह बारव बचाव मोहीमेचे प्रतिनिधी रोहन काळे, अभ्यासक डॉ. पराग सदगीर, डॉ. चंद्रकांत रागिट, सुभाष शिंदे, श्रीनिवास वडगबळाकर, सुभाष शिंदे, श्रीकांत उमरीकर, प्रमोद कुलकर्णी, सौरभ जामकर, अरविंद कडबे, अँड. धायगुडे, भागवत मसणे उपस्थितीत होते. जुन्नर शहरात बारव संवर्धनाची कार्यशाळा घ्यावी राज्य शासनाच्या बारव संवर्धन योजनेत जुन्नर शहरातील बारव ग्रामपंचायतीची बारव आणि शिवकालिन पाणीपुरवठा योजनेच्या संवर्धनासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने जुन्नर शहरात अभ्यासक, अभियंते, शासकिय अधिकारी, धोरणकर्ते यांची कार्यशाळा घ्यावी अशी मागणी आम्ही सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे केली आहे.
– राहूल जोशी
अध्यक्ष – सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर जि.पुणे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!