ओतूरमध्ये खळबळ: लॉजमध्ये ३० वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू

1 min read

ओतूर दि.१६:- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे शनिवारी रात्री घडलेल्या एका संशयास्पद मृत्यूच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अवसरी (ता. जुन्नर) येथील स्नेहल अमूल शिंदे (वय ३०) या महिलेचा मृतदेह ओतूरमधील अमृत लॉजमध्ये आढळून आला.

वाघिरे महाविद्यालयासमोर असलेल्या एका लॉजमध्ये संबंधित महिला बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पाहणीनंतर महिलेला तातडीने ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

घटनेनंतर ओतूर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, मृत्यूमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा मृत्यू नैसर्गिक आहे की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस विविध अंगांनी करत आहेत.

लॉजमधील नोंदी, सीसीटीव्ही फुटेज तसेच संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. अवसरी येथील ३० वर्षीय महिलेचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.

ओतूर पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!