महिलांच्या एस.टी. तिकीट सवलत योजनेचा पुनर्विचार करण्याची मागणी
1 min read
बोरी खुर्द दि.१५:-बोरी खुर्द (ता. जुन्नर) येथील समाजसेवक राजेंद्र भोर यांनी एसटी महामंडळा मार्फत महिलांना देण्यात आलेल्या ५०% तिकीट सवलत तसेच मोफत प्रवास योजनांचा पुनर्विचार करण्याची मागणी राज्याचे परिवहन मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, शासनाचा महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना दिलेला प्रवास सवलतीचा निर्णय सामाजिकदृष्ट्या चांगला असला तरी ग्रामीण व निमशहरी भागात यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी गर्दी वाढली आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या वेळेत पूर्ण तिकीट भरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना,
नोकरदारांना व सामान्य नागरिकांना उभे राहून प्रवास करावा लागत असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच अनेक मार्गांवर एस.टी. बसची संख्या अपुरी असल्यामुळे वेळेवर प्रवास करणे कठीण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वृद्ध, दिव्यांग व आजारी प्रवाशांनाही गर्दीमुळे गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.राजेंद्र भोर यांनी शासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत :- महिलांच्या ५०% तिकीट सवलत योजनेचा पुनर्विचार करावा.- मोफत प्रवास योजनांचा गैरवापर रोखण्यासाठी नियंत्रण ठेवावे.
– गर्दीच्या मार्गांवर अतिरिक्त बसची व्यवस्था करावी.- पूर्ण तिकीट भरणाऱ्या प्रवाशांसाठी प्राधान्य व्यवस्था करावी.- या योजनांचा एस.टी.महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होणाऱ्या परिणामाचा सार्वजनिक अहवाल प्रसिद्ध करावा.सर्वसामान्य प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने योग्य निर्णय घ्यावा व एस.टी.सेवा अधिक सक्षम व संतुलित करावी, अशी मागणी राजेंद्र भोर यांनी केली आहे.
