जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन
1 min read
अहिल्यानगर, दि.१२:- भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार, १२ ते १४ मे २०२६ दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली असून “यलो अलर्ट” जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव व पशू-प्राणी
यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.प्रशासनाने नागरिकांना खालीलप्रमाणे दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत :
नागरिकांनी काय करावे ?
– तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पुरेसे पाणी प्यावे. – शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस. घ्यावे, तसेच घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करावा.- घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.
– तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. – प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. – उन्हापासून बचाव करण्यासाठी हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.- घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
– पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा व थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.- अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा.
काय करू नये ?
– दुपारी १२.०० ते ०३.०० वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा. – उन्हात अतिकष्टाचे कामे करू नका. – बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत.- गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. – दारु, चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. – उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.
– उन्हाच्या कालावधीत शक्यतो स्वयंपाक करण्याचे टाळावे व मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. – उष्माघाताची लक्षणे दिसताच सर्व नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. – मदतीसाठी व आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी १०७७, १०२, १०४, १०८ व ११२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
