अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना १ ली मध्ये नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी २९ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

1 min read

अहिल्यानगर दि.८:- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दि. २९ मे २०२६ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी मनोजकुमार पैठणकर यांनी केले आहे.योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असणे आवश्यक असून, पालकांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल १ लाख रुपये असावे. प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय दि. ३१ डिसेंबर २०२६ रोजी ६ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याचा जन्म दि. १ जुलै २०१९ ते दि.३१ डिसेंबर २०२० या कालावधीत झालेला असावा.विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेत विधवा, घटस्फोटित, निराधार किंवा परित्यक्ता महिला पालकांच्या पाल्यांना तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवेशानंतर इयत्ता बारावीपर्यंत शाळा बदलून मिळणार नाही. शासनाकडून विद्यार्थी क्षमता मंजूर झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची योजनेंतर्गत निवड केली जाईल.अर्जासोबत विद्यार्थ्याचा जन्मदाखला, जातीचे प्रमाणपत्र, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थ्याचे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो, पालक दारिद्र्यरेषेखालील असल्यास ग्रामसेवकाचा दाखला, महिला पालक विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्त्या असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.योजनेअंतर्गत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह परिपूर्ण अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर येथे मुदतीत दाखल करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२४२४ – २५१०३७ या क्रमांकावर संपर्क साधावा,असेही कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!