तामिळनाडूच्या बाजरी वाणाचा जुन्नर तालुक्यात यशस्वी प्रयोग
1 min read
बेल्हे दि.५:- बोरी खुर्द, साळवाडी (ता.जुन्नर) परिसरात तामिळनाडू राज्यातील कोइंबतूर येथील कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या COH-10 या बाजरीच्या संशोधित वाणाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला असून शेतकऱ्यांमध्ये उत्पादनाबाबत नवी आशा निर्माण केली आहे.
बोरी खुर्द चे शेतकरी संपत गणपत चिंचवडे यांनी आपल्या १ एकर क्षेत्रावर या वाणाची लागवड करून उल्लेखनीय यश मिळवले आहे. मागील वर्षी आत्मा कृषी विभाग, पुणे यांच्या माध्यमातून जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा कोइंबतूर (तामिळनाडू) येथील कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता.
या दौऱ्यात COH-10 वाणाची प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर पाहणी व अहवालाचा अभ्यास केल्यानंतर चिंचवडे यांनी हा वाण तेथून आणून आपल्या शेतात पेरला.या वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे सुमारे एक फूट लांबीचे भरगच्च कणीस, टपोरे दाणे आणि अधिक उत्पादन देण्याची क्षमता. पिकाची वाढ जोमदार असून
काढणीपर्यंत हिरवेगार व लुसलुशीत ताट दिसून येत आहे. योग्य व्यवस्थापनामुळे या पिकातून एकरी सुमारे ३० क्विंटल उत्पादन मिळेल, असा विश्वास चिंचवडे यांनी व्यक्त केला आहे.या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली असून अनेक शेतकरी चिंचवडे यांच्या शेताला भेट देऊन पिकाची पाहणी करत आहेत.
दरम्यान, आत्मा कृषी विभागाच्या वतीने चिंचवडे यांच्या शेतावर पीक पाहणी व कृषी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेगाव येथील आत्मा कृषी विभागाचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक डी. डी. पाबळे व जुन्नरचे तंत्रज्ञान व्यवस्थापक सूर्यकांत विरनक यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
पाबळे यांनी पुढील हंगामात अधिकाधिक शेतकऱ्यांनी COH-10 वाणाची लागवड करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन केले. या प्रसंगी जुन्नर-आंबेगाव ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा विघ्नहर कारखान्याचे तज्ञ संचालक विकास चव्हाण, विजय डुकरे, उत्तम जाधव, बाबाजी बांगर, सतीश दातखिळे, ओमकार वाळुंज यांसह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
