ममता बॅनर्जींचा भवानीपुरातून पराभव; पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर
1 min read
नवीदिल्ली दि.५:- पश्चिम बंगालच्या निकालात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपल्या हक्काच्या भवानीपूर मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला आहे. गेल्या १५ वर्षांपासून बंगालवर सत्ता गाजवणाऱ्या दीदींना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे.
भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा १५,११४ मतांनी पराभव केला आहे.एकेकाळच्या आपल्याच विश्वासू सहकाऱ्याने दीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. या पराभवामुळे तृणमूल काँग्रेसच्या गोटात मोठी शांतता पसरली आहे.दिवसभर या मतदारसंघामध्ये आघाडी पिछाडीचा खेळ सुरु होता.
पण आता या मतदारसंघाचा संपूर्ण निकाल हाती आला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणातील सर्वात प्रतिष्ठेच्या भवानीपूर मतदारसंघात अखेर भाजपने बाजी मारली आहे. २० व्या आणि शेवटच्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे.
एकेकाळचे ममतांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या शुभेंदू अधिकारी यांनी सलग दुसऱ्यांदा त्यांना थेट लढतीत पराभूत करून आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. २०२१ मध्येही त्यांनी ममतांना पराभूत केलं होतं. या निकालामुळे केवळ भवानीपूरच नाही, तर संपूर्ण बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.
पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक विजयानंतर नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
त्यानंतर मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पश्चिम बंगालमध्ये आता भयमुक्त झालं आणि विकासयुक्त सरकार सत्तेत आलं असं मोदी यावेळी म्हणाले. सोबतच केरळ, तामिळनाडूत विभाजनवादी सरकार सत्तेबाहेर गेल्यानं नवा सूर्योदय झाल्याची भावनाही मोदींनी यावेळी व्यक्त केली.
