आणे पठार ‘जलतारा’ च्या माध्यमातून क्रांती घडवणार
1 min read
आणे दि.४ :- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणे पठार हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. येथे आणे, पेमदरा, नळवणे, शिंदेवाडी, आनंदवाडी, व्हरुंडी या प्रमुख गावांचा समावेश होतो. त्यामुळे या पठार भागातील जमिनीवर ‘जलतारा’ तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेले खड्डे भूजल पातळी वाढवण्यासाठी क्रांती घडवू शकणार आहे.
आणे (ता.जुन्नर) येथे श्री रंगदास स्वामी महाराज मंदिराच्या सभागृहात पठार भागातील गावांमध्ये जलसंधारण कामा संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रबोधनपर कार्यशाळेत जलतारा प्रकल्पाचे जनक डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. पुरुषोत्तम वायाळ बोलताना म्हणाले की,
‘जलतारा प्रकल्पांतर्गत विशिष्ट अंतरावर शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे घेतल्यास, हे पाणी जमिनीत खोलवर मुरण्यास मदत होते. हे तंत्रज्ञान अत्यंत कमी खर्चाचे असून, यामुळे विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत शाश्वत वाढ होते. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून,
प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात सर्वेक्षण केलेल्या ठिकाणी ‘जलतारा’ खड्डे घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यशाळेत डॉ. वायाळ यांनी प्रत्यक्षात खड्डे घेण्याची पद्धत आणि त्याचे तांत्रिक निकष व्हिडिओच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले.
या प्रसंगी न्यू स्टार्ट फाऊंडेशन पुणे चे डॉ. अमोल आहेर, आर्ट ऑफ लिव्हिंग चे ओंकार आल्हाट, रोहित गटकळ, सरपंच प्रियंका दाते, सुरेश पंदारे, माजी सैनिक भास्कर डोंगरे, बाबाजी दाते, दिनकर आहेर आदी मान्यवरांसह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
