कलिंगड नव्हे ‘त्या’ चौघांच्या मृत्यूचं कारण वेगळंच असण्याचा पोलीसांना संशय; पोलीसांचा तपास वेगळ्या दिशेने सुरू
1 min read
मुंबई दि.३०:- मुंबईतील पायधुनी परिसरात एका कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण शहर हादरलं आहे.रविवारी रात्री या कुटुंबीयांने घरी बिर्याणी खाल्ली होती. यानंतर रात्री उशिरा त्यांनी कलिंगड खाल्लं होतं. मात्र यानंतर पहाटे त्यांना मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा तीव्र त्रास जाणवू लागला.
यात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी अंत झाला. मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका सदस्याने बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याची माहिती पोलिसांना दिली होती.याच जबाबावरून बिर्याणी किंवा कलिंगडमधून अन्न विषबाधा झाली असावी, किंवा दोन्ही पदार्थांमुळे पोटात वेगळी रिअँक्शन घडून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत होता.
पोलिसांनी चारही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.तसेच त्यांनी खालेल्या कलिंगडाचे नमुने तपासणी साठी फॉरेन्सिक टीममकडे पाठवले आहेत. पोलीसांकडून मृत्यूच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, आता या प्रकरणात एक खळबळजनक खुलासा समोर येत आहेत.
मृतांच्या शरीरात “पेनकिलर-सदृश” (वेदनाशामक) पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जेजे रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदनादरम्यान हा संशयास्पद घटक आढळल्याचं समजत आहे, मात्र रुग्णालय प्रशासनाने अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नाही.
शरीरात पेनकिलर सदृश्य पदार्थ आढळल्याने चौघांच्या मृत्यूचं कारण कलिंगड किंवा बिर्याणी नसून हे औषध असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र याची अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही.
*अन्न विषबाधेमुळे इतक्या वेगाने मृत्यू होणं दुर्मिळ?*
अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलींचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार हे प्रकरण ‘फूड पॉयझनिंग’ (अन्न विषबाधा) असल्याचं म्हटले जात होते. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते,
केवळ दूषित अन्नामुळे संपूर्ण कुटुंबाचा इतक्या कमी वेळात मृत्यू होणं,ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणत्याही तीव्र विषारी घटकाचा किंवा अन्य बाह्य कारणांचा समावेश आहे का, याचा तपास फॉरेन्सिक टीमद्वारे केला जात आहे.
*आर्थिक व्यवहार आणि मोबाईलची तपासणी*
केवळ अन्न बाधेच्या अँगलवर विसंबून न राहता, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी सुरू केला आहे. पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोन जप्त केले असून, शेवटच्या काही तासांत कोणाशी संवाद झाला होता का? याची तपासणी केली जात आहे. तसेच कुटुंबप्रमुख अब्दुल्ला डोकाडिया यांच्या व्यावसायिक उलाढाली आणि बँक खात्यांचे तपशीलही तपासले जात आहेत.
*त्या रात्री नेमकं काय घडलं होतं?*
२५ एप्रिल रोजी रात्री डोकाडिया कुटुंबाने कलिंगड खाल्लं होते. त्यानंतर काही वेळातच सर्वांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. २६ एप्रिलला दोन्ही मुली बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने जेजे रुग्णालयात हलवण्यात आले.
दुर्दैवाने, उपचारादरम्यान दोन्ही मुलींसह त्यांच्या आई-वडिलांचाही अंत झाला. एकाच कुटुंबाचा असा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
