कर्जुले हर्या येथील मातोश्री आयुर्वेद महाविद्यालयाची महाराष्ट्र दिनापासून ‘आरोग्यवारी’
1 min read
कर्जुले हर्या दि.२८:- कर्जुले हर्या (ता.पारनेर) येथील मातोश्री आयुर्वेद महाविद्यालयातर्फे ग्रामीण भागातील महिला, ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा व आरोग्य योजनेची माहिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र दिनाचे (एक मे) औचित्य साधून ‘आरोग्यवारी’ काढण्यात येणार आहे.
पारनेरसह जुन्नर व संगमनेर तालुक्यातील ६० ते ७० गावांत ही आरोग्यवारी जाणार असल्याची माहिती डॉ. दीपक आहेर व डॉ. श्वेतांबरी आहेर यांनी दिली.२०२१ मध्ये कोरोना काळात जिल्ह्यातील पहिले कोविड सेंटर मातोश्री रुग्णालयात सुरू करण्यात आले होते. त्यावेळी तीन हजार रुग्णांना कोरोनातून जीवदान मिळाले.
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आता ‘आरोग्यवारी’ हा नावीन्यपूर्ण उपक्रमराबवण्यात येत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेंतर्गत मातोश्री रुग्णालयात मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
या आरोग्य वारीत महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर, रक्तातील साखरेची तपासणी, ज्येष्ठ नागरिकांची वैद्यकीय तपासणी, नेत्रतपासणी मोफत केली जाणार आहे. शिवाय, रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत.
स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी कन्या झाल्यास मोफत वैद्यकीय उपचार करण्यात आले होते. महिलांसाठी गावोगावी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर, मोफत प्रसुती, वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती मातोश्री शैक्षणिक संस्थेचे सचिव किरण आहेर यांनी दिली.
